मुंबईः राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असून शेतीसाठी बैल घेण्याची ऐपत नसल्याने लातूर जिल्हयात एका शेतकऱ्यालाच औत ओढावे लागले. आॅनलाईन खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होत असून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यापासून सरकार पळ काढत असल्याचा आरोप करीत विरोधकानी बुधवारी दोनवेळा विधानसभेत सभात्याग केला. तर शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार आहे. मात्र विरोधक नाहक राजकारण करुन सरकारला बदनाम करीत असल्याचा प्रत्यारोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, शेतमालाला हमीभाव मिळत नाही. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत ,कापसाला भाव मिळालेला नसल्याचे सांगत शेतकरी प्रश्नावर सरकार असंवेदनशील आहे, चर्चा टाळत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, जयंत पाटील आदींनी केला. शेतमालाला दीडपट भाव देऊ, कर्जमाफी देऊ असे सांगत सरकार सत्तेवर आले मात्र आता शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुलर्क्ष केले जात आहे.शक्तिपीठ महामार्गासाठी सरकार २० हजार कोटी मंजूर करते. पण शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे देत नाही. सोयाबीन, कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे मिळालेले नसून शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. नांगराला बैल जुंपण्याचा खर्च परवडत नाही म्हणून लातूरमधीलअंबादास पवार या शेतकऱ्याने बैलाऐवजी स्वतःला नांगराला जुंपले. मात्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायची नाही असा आरोप विरोधकांनी केला.अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्ताव फेटाळल्यामुळे आक्रमक झालेल्या विरोधकांनी शेतकरी प्रश्नावर सरकार असंवेदनशील आहे, चर्चा टाळत असल्याचा आरोप करीत दोनेळा सभात्याग केला.
केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार- अजित पवार
शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यात शेतकऱ्यांचेच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडविणे, त्यांना मदत करणे सरकारची जबाबदारी आम्ही ती पार पाडूच. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्यास सरकार तयार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या अडचणींची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. कोणतीही अडचण असो, सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. आम्ही केवळ बोलत नाही, तर प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवतो. शेतकऱ्यांचे हित साधणे, त्यांचे प्रश्न सोडवणे हे सरकारच्या धोरणात सर्वोच्च प्राधान्याने आहे. कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना एकटे पडू देणार नाही. मात्र विरोधक राजकारण करीत सरकारला बदनाम करीत असल्याचा आरोपही पवार यांनी केला.