संसर्ग प्रसार आणि बाधितांचे प्रमाण कमी; बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत

मुंबई : राज्यातील २४ जिल्ह्य़ांमध्ये डेल्टा पल्स या करोनाच्या उत्परिवर्तित विषाणूच्या प्रकाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे. यात सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी आणि जळगाव जिल्ह्य़ामध्ये आढळले असले तरी त्या तुलनेत येथे बाधितांचे प्रमाण वाढलेले नाही. त्यामुळे डेल्टा प्लसच्या प्रसाराचा वेग हा डेल्टाच्या तुलनेत कमी आहे. मात्र तरीही यावर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

सोमवारी नव्याने २७ डेल्टा प्लसबाधित रुग्ण आढळल्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या १०३ झाली आहे. आता एकूण २४ जिल्ह्य़ांमध्ये याचा प्रादुर्भाव असल्याचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) चाचण्यांमधून निदर्शनास आले आहे. यात ५० टक्के रुग्ण हे विदर्भ आणि कोकण विभागात आढळले आहेत.

‘रत्नागिरी जिल्ह्य़ातील सर्वाधिक १५ रुग्ण हे संगमेश्वर तालुक्यात आढळले आहेत. परंतु या भागात संसर्गाचा प्रसार वाढल्याचे किंवा एकाच ठिकाणी रुग्णसंख्या वाढलेली आढळलेले नाही. कोकण विभागात बाधितांचे प्रमाण जास्त सिंधुदुर्ग आणि चिपळूणमध्ये होते. रत्नागिरीतील बाधितांचे प्रमाण तर आता दोन टक्कय़ांच्याही खाली आले आहे’, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.

‘जळगावमध्ये १३ रुग्ण हे विविध ठिकाणी आढळले असून या गावांमध्ये सुमारे ५०० आरटीपीसीआर चाचण्या करूनही बाधितांचे प्रमाण फारसे आढळलेले नाही. हे रुग्ण जूनमध्ये बाधित झाले होते. यांच्या संपर्कातीलही फारसे बाधित झाल्याचे दिसून आलेले नाही’, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पातोडे यांनी सांगितले.

डेल्टा प्लस हा विषाणूचा प्रकार आढळून  एक महिन्याहूनही अधिक काळ उलटला आहे. एखाद्या भागात विषाणूचा संसर्ग पसरण्यास साधारण १४ दिवसांचा कालावधी लागतो. यानुसार दुपटीहून अधिक कालवधी उलटला तरी डेल्टाच्या तुलनेत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढल्याचे आढळलेले नाही. त्यामुळे संसर्ग प्रसाराचा वेगकमी आहे. परंतु हा डेल्टाचा उपप्रकार असल्यामुळे यात त्याचेच अंश आहेत. त्यामुळे याची घातकता कमी आहे असे सध्या म्हणता येणार नाही. यासाठी आणखी मोठय़ा प्रमाणात रुग्णसंख्येचा अभ्यास होणे आवश्यक आहे, असे आरोग्य आयुक्तालयाचे माजी संचालक आणि एपिडेमियोलॉजिस्ट डॉ. प्रकाश डोके यांनी सांगितले.

भारतात आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या अगदीच कमी आहे. यावरून लगेचच निष्कर्ष काढणे चुकीचे आहे. परंतु परदेशात या विषाणूचा प्रकार अधिक घातक असल्याचे आढळले आहे. त्यामुळे लगेचच अनुमान न काढता चिंताजनक विषाणूच्या प्रकारानुसार यावर बारकाईने नजर ठेवणे आवश्यक आहे, असे मत करोना कृतिदलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले.

जिल्हानिहाय रुग्णांची आकडेवारी

जळगाव (१३), रत्नागिरी (१५), मुंबई (११), कोल्हापूर (७), ठाणे, पुणे, अमरावती, गडचिरोली प्रत्येकी सहा, नागपूर (५), अहमदनगर (४), पालघर, रायगड, अमरावती प्रत्येकी तीन, नांदेड, गोंदिया, सिंधुदुर्ग, नाशिक प्रत्येकी दोन, चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, बीड, भंडारा प्रत्येकी एक

* ९८ रुग्ण आजारातून बरे

* पाच रुग्णांचा मृत्यू (रत्नागिरी दोन आणि बीड, मुंबई आणि रायगड प्रत्येकी एक)

* १७ जणांच्या लशींच्या दोन्ही मात्रा, तर १८ जणांची केवळ एक मात्रा पूर्ण