मुंबई: राज्यातील राष्ट्रीय तसेच जिल्हा मार्गावर मोठया प्रमाणात वृक्षलागवड केली जात आहे. रस्त्यांच्या कंत्राटदारांकडून लावण्यात येणारी ही वृक्ष लागवड जिवंत आहेत की नाही याची तपासणी केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधानपरिषदेत दिले. मुंबई नागपूरला जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर एकूण ३३ लाख ६५ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार असून २१ लाख वृक्ष लावण्यात आल्याचे भोसले यांनी सांगितले.

राज्यातील राष्ट्रीय, राज्य, आणि जिल्ह्यातील रस्त्यांची कामे करताना लाखो झाडांची तोड झाली आहे. रस्त्याची कामे करणाऱ्या कंत्राटदाराला एक झाड तोडल्यास दहा वृक्ष लागवड करण्याचे बंधनकारक आहे. ही अट कंत्राटदार पाळत नाही. राज्यातील नवीन रस्ते निर्मितीत रत्यांच्या दुर्तफा झाडे दिसून येत नाहीत.समृध्दी मार्गात तीन लाख झाडे तोडण्यात आली. २५ वर्षापूर्वी पूर्ण झालेल्या मुंबई पुणे महामार्गात ३५ हजार झाडांची कत्तल झाली आहे.

पुणे बेंगळरु महामार्गात १२ हजार, कोल्हापूर कळे मार्गावर १४०० अशा लाखो झाडांची तोड मागील काही वर्षात झाली आहे. त्या तुलनेत तयार झालेल्या मार्गावर झाडे दिसत नाहीत. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची लक्षवेधी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अमोल मिटकरी यांनी मांडली. त्याला शिवेंद्रराजे भोसले यांनी उत्तर दिले. समृध्दी महामार्गावर तीन लाख १२ हजार वृक्षांची तोड झाली आहे. त्याबदल्यात ३३ लाख ६५ हजार ३१० वृक्ष लागवड केली जाणार आहे. त्यातील २१ लाख रोपांची लागवड करण्यात आल्याची माहिती भोसले यांनी लेखी उत्तरात दिली.

भारतीय वनस्पती सर्वेक्षण पुणे यांच्या वतीने या लागवडीची तांत्रिक पडताळणी करण्यात येणार आहे. रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर १६ हजार ९६९ झाडे तोडण्यात आली आहेत. या मार्गावर वृक्ष लागवडीची कार्यवाही सुरु आहे. मुंबई पुणे महामार्गावर २५ वर्षापूर्वी ३५ हजार झाडे तोडण्यात आली. त्याबदल्यात महामार्गाच्या दुभाजकावर झुडपांची जोपासना करण्यात आली आहे. या मार्गावर एक लाख वृक्ष लागवड करण्यात आली असे सांगण्यात आले मात्र या मार्गावर मोठी झाडे नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुभाजकांवर लावण्यात आलेली फुलांची लागवड हीच एक लाख झाडे आहेत का असा प्रश्न या मार्गावरील प्रवाशांना पडला आहे. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर ११५० झाडे वन विभागाच्या परवानगीने तोडण्यात आली आहेत. या ठिकाणी ३ हजार झाडे लावली जाणार आहेत. वृक्षलागवड केली जाते पण ती वृक्ष जगली आहेत का ते पाहिले जात नाही. त्याचे सर्वेक्षण करण्यात येईल असे भोसले यांनी सांगितले.