मुंबई : केंद्र सरकारने ठाणे जिल्ह्यातील ५३.१७४ एकर मिठागराची जमीन महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती समाज माध्यमांवर दिली. ही जमीन दहिसर – वसई खाडीदरम्यान होणाऱ्या महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेच्या वर्सोवा – भाईंदर प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगरपालिकेने सागरी किनारा मार्गाचे काम हाती घेतले असून मरीन ड्राईव्ह – वरळीदरम्यानच्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पाच्या उत्तर मुंबईतील भागावर आता मुंबई महानगरपालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. वर्सोवा दहिसर हा सागरी किनारा मार्ग मुंबई महापालिकेतर्फे उभारला जात आहे. हा मार्ग पुढे दहिसर – भाईंदर उन्नत मार्गाला जोडला जाणार आहे. दहिसर – भाईंदर उन्नत मार्गही मुंबई महापालिकेतर्फे उभारला जाणार आहे.
तर पुढे भाईंदर – वसईखाडी भागातील काम एमएमआरडीएद्वारे करण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नरिमन पॉईंट येथून थेट दहिसर, भाईंदर, तसेच पुढे वसईपर्यंत जाता येणार आहे. संपूर्ण मुंबईची किनारीपट्टी यामुळे एकमेकांना जोडली जाणार आहे. मात्र दहिसरच्या पुढचा प्रकल्पाचा भाग खार जमिनीतून, कांदळवनातून जातो. त्यामुळे या प्रकल्पासाठी परवानगी, भूसंपादन अशा अनेक दिव्यातून जावे लागणार आहे.
प्रकल्पाची मार्गरेषा खाडीवरून
या प्रकल्पाची मार्गरेषा जमिनीवरून आणि खाडीवरून जाते. प्रकल्पाचा बहुतांश भाग किनारी नियमन क्षेत्रामधून (सीआरझेड) जातो. मुंबई महानगरपालिकेने केंद्र शासन, राज्य शासनाच्या विविध विभागाकडून प्रकल्पाच्या अनुषंगाने विविध पर्यावरण परवानगी / ना – हरकत प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत.
वर्सोवा – भाईंदर सागरी किनारा मार्ग प्रकल्पांतर्गत कांदळवन वळतीकरण प्रस्तावास केंद्रीय पर्यावरण, वन मंत्रालय व वातावरणीय बदल मंत्रालयाची तत्वत: मान्यता प्राप्त झाली आहे. त्यातच आता या प्रकल्पासाठी लागणारी मिठागराची जमीन महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.
भाईंदर – वसईखाडी प्रकल्पाचा भाग एमएमआरडीएकडे
दहिसर – वसई प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यापैकी दहिसर – भाईंदर या भागातील (कोस्टल रोड) काम मुंबई महापालिका करणार आहे. तर भाईंदर – वसई खाडी या भागातील काम एमएमआरडीए करणार आहे.