मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईच्या हद्दीतील पवई तलाव बुधवारी पहाटे ६ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला. या तलावातील प्रामुख्याने औद्योगिक वापर व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरण्यात येते. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला पवई तलाव दुथंडी भरून वाहू लागला आहे. गेल्या दोन दिवसात तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला, अशी माहिती महापालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली.
सद्यस्थितीत तलावाची पाणी पातळी १९५.१० फूट इतकी आहे. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावातील पाणी पिण्यायोग्य नसल्याने त्याचा वापर औद्योगिक कारणासाठी होतो. पवई तलाव हा कृतिम तलाव असून १८९० मध्ये १२.५९ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ चौरस किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते.
या तलावाची पूर्ण भरून वाहण्याची पातळी ही १९५ फूट आहे. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर (५,४५५ दशलक्ष लिटर) पाणी असते. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर पाणी मिठी नदीला जाऊन मिळते. दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यातही वाढ होऊ लागली आहे. सोमवारी ८.६० टक्के असलेला पाणीसाठा मंगळवारी ९.७८ टक्के झाला. तर बुधवारी सकाळी पाणीसाठा १०.१९ टक्के झाला होता. खालावलेल्या पाणीसाठ्यात वाढ होत असल्यामुळे मुंबईकरांसह पालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
यंदा पाऊस लवकर आला असला तरीच असला तरी धरणक्षेत्रात पावसाने जोर धरलेला नव्हता. मुंबईच्या हद्दीतील विहार आणि तुळशी तलावातील पाण्याची पातळी वाढत असली तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा खालवतच होता. मात्र गेले दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे सातही धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सातही धरणांत मिळून १ लाख ४७ हजार ४८८ दशलक्ष लीटर म्हणजेच १०.१९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर इतकी आहे.