मुंबई : लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांचे सामान चोरणाऱ्या एका आंतरराज्य टोळीतील दोन कुख्यात चोरांना रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून २२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या टोळीविरोधात विविध पोलीस ठाण्यात १६ गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे मागील ७ वर्षांपासून ही टोळी सक्रीय असून पहिल्यांदाच पोलिसांच्या हाती लागली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांचे मौल्यवान साहित्य चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. प्रवासी झोपले असताना किंवा गर्दीत प्रवाशांचे पर्स, बॅगा लंपास केल्या जात होत्या. यामुळे प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. राजकोट एक्स्प्रेसमधून २३ मे रोजी प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या पॅंटचा खिसा कापून त्यातून साडेतीन लाखांच्या सोन्याच्या बांगड्या, लॉकेट आणि रोख रक्कम चोरण्यात आल्या होत्या. रेल्वेगाड्यांमधील असे गुन्हे वाढत असल्याने रेल्वे पोलीस आयुक्त राकेस कलासागर यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला तपास करण्याचे निर्देश दिले होते.
असा केला तपास
गुन्हे शाखेच्या कल्याण कक्षाने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. मागील काही गुन्ह्यात एकाच पध्दतीने चोरी करण्यात आली होती. त्यावरून चोरी करण्याच्या पध्दतीचा पोलिसांना बारकाईने अभ्यास केला. काही दुवे शोधले आणि सायबर पोलिसांच्या मदतीने तांत्रिक तपास करण्यात आला. त्याआधारे वकार खान (३९) आणि जुगल विश्वकर्मा (४१) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून २२ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरोधात कल्याण, ठाणे, कर्जत. डोंबिवली आदी विविध रेल्वे पोलीस ठाण्यांत १६ गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीतील अन्य दोन साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासह त्यांनी अन्य राज्यात अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत.
सात वर्षात पहिल्यांदाच अटक
ही टोळी मूळची उत्तर प्रदेशातील आहे. या टोळीविरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्ह्यांची नोंद आहे. मात्र ७ वर्षांत या टोळीतील कुख्यात चोर पहिल्यांदाच पोलिसांच्या हाती लागले आहेत. यामुळे रेल्वेगाडीत होणारे गुन्हे कमी होतील, असा विश्वास पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी व्यक्त केला आहे.
या पथकाने केली कारवाई
रेल्वे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर, पोलीस निरीक्षक रोहीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने, तसेच सायबर कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश खाडे, देवीदास अरण्ये यांच्या तांत्रिक मदतीने या टोळीतील दोघांना अटक करण्यात यश आले.