दळण आणि ‘वळण’ : सावध ऐका पुढल्या हाका..

मुंबईच्या उपनगरीय भागात तर मध्य रेल्वेसाठी दिवसही वैऱ्याचे ठरत आहेत.

दोन महिन्यांपासून देशभरात रेल्वेवर अनेक ठिकाणी घातपात घडवून आणण्याचे प्रयत्न उघडकीस आल्याचे सांगितले जात आहे. आंध्र प्रदेश आणि कानपूर येथे झालेल्या रेल्वे अपघातांमध्ये आयएसआय या पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे..

देशभरातील रेल्वेसाठी सध्या रात्र वैऱ्याची आहे. मुंबईच्या उपनगरीय भागात तर मध्य रेल्वेसाठी दिवसही वैऱ्याचे ठरत आहेत. रेल्वेवर रूळ आडवे टाकून वा जिलेटिनच्या कांडय़ा, तसेच भलेमोठे दगड रुळांवर ठेवून अपघात घडविण्याचे प्रकार गेल्या महिन्यात पाहायला मिळाले. हा सारा प्रकार वेळीच उघडकीस आल्यामुळे मोठे अपघात टळले आणि अद्याप तरी मुंबईकर सुरक्षित प्रवास करीत आहेत; परंतु या सर्वच घटनांकडे अधिक सावधगिरीने पाहण्याची गरज आहे.

वास्तविक देशभरात देशप्रेमी आणि देशद्रोही ठरविण्याचा झंझावात सुरू असताना प्रश्न विचारणे धोक्याचे ठरू शकते; पण असे प्रश्न उपस्थित करणे गरजेचे आहे. कानपूरजवळ झालेल्या अपघातात तब्बल १५० जणांचा जीव गेला. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील मोठय़ा अपघातांपैकी हा एक अपघात आहे. रूळ तुटल्याने हा अपघात झाला होता. चौकशीअंती हा रूळ तुटला नसून तोडला गेल्याचे निष्कर्ष पोलिसांनी काढले. तसेच यामागे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात आहे, असेही लक्षात आले. या प्रकरणी नेपाळच्या सीमेवरून काहींना अटकही करण्यात आली.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघातामागे असलेली घातपाताची शक्यता मान्य केल्यानंतर देशभरात होणाऱ्या प्रत्येक अपघाताला आणि रेल्वेच्या बिघाडांना घातपाताचे स्वरूप देण्याचा प्रकार सुरू झाला. हा प्रकार धोकादायकच नाही, तर रेल्वे सेवेच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. मध्य रेल्वेवर दिवा आणि मुंब्रा स्थानकाजवळ सात मीटरचा सुटा रूळ रुळांवर आडवा टाकला होता. या मार्गावरून जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या लोको पायलटला हा रूळ दिसला आणि अपघात टळला.

मध्य रेल्वेवरील ‘घातपाता’चा हा पहिला प्रयत्न होता. जनशताब्दी एक्स्प्रेस जाण्याच्या १७ मिनिटे आधी या मार्गावरून एक जलद लोकल गेली होती. म्हणजेच रूळ उचलून तो रुळांवर आडवा टाकण्यासाठी समाजकंटकांकडे १७ मिनिटे होती. सात मीटर रुळाचे वजन ४०० किलोच्या आसपास असते. तसेच रूळ उचलण्याचे एक तंत्र असून ते रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनाच योग्य प्रकारे माहीत असते. रूळ उचलण्यासाठीही या कामगारांकडे काही साधने असतात. ४०० किलो वजनाचा रूळ उचलण्यासाठी किमान सहा ते आठ व्यक्ती असणे गरजेचे असते. हे काम गर्दुल्ले एकटय़ादुकटय़ाने करू शकत नाहीत. त्यामुळे हे काम नक्की कोणी केले, याचा शोध घेणे आवश्यक आहे. ही घटना घडून महिना उलटत आला, तरी अद्याप पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ शकलेले नाहीत.

त्यानंतर दिवा-पनवेल या सेक्शनमध्ये अशा प्रकारच्या दोन घटना आणि पनवेल-उरण मार्गावर एक घटना घडली. विशेष म्हणजे घातपाती कारवाया करणाऱ्या ‘दहशतवाद्यां’ना अधिकाधिक लोकांचा जीव घेण्याबरोबरच दळण-वळण ठप्प करण्यात अधिक रस असतो. दिवा-पनवेल मार्गावरून प्रवासी वाहतूक कमी होते. त्यामुळे या मार्गावर ‘घातपात’ घडवून आणल्यामुळे कोणत्या गोष्टी साध्य होणार, हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. दहशतवाद्यांना घातपात करायचेच असतील, तर उपनगरीय रेल्वे वाहतूक होते त्या मार्गावर ते घडवले जातील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घातपाताचे हे प्रयत्न फक्त मध्य रेल्वेवर झाले आहेत. मुंबईला दिल्ली, अहमदाबाद अशा मुख्य शहरांशी जोडणाऱ्या पश्चिम रेल्वेवर असा कोणताही प्रयत्न झालेला नाही. पण हा मुद्दा ना रेल्वे अधिकारी मान्य करतात ना रेल्वेचे कामगार!

या सर्व घातपाताच्या कारवाया नेमक्या कोणी केल्या, हा प्रश्न आहेच. पण त्याही पेक्षा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीमध्ये होणाऱ्या ढिलाईला झाकण्यासाठी तर या प्रकारांना घातपाताचा रंग दिला जात नाही ना? हा प्रश्न पडायचे कारण की, रेल्वेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी लागणारे कर्मचारी खूप कमी आहेत. रेल्वे वाहतुकीचा कणा मानल्या जाणाऱ्या गँगमनच्या सुमारे एक लाख जागा देशभरात रिक्त आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई विभागातील रेल्वेची यंत्रणा जुनी झाली आहे. मध्य तसेच पश्चिम रेल्वेवर देखभाल दुरुस्तीसाठी मिळणारा वेळ खूपच कमी आहे. त्यामुळे बिघाडांचे प्रमाण जास्त आहे.

मध्य रेल्वेवर रूळ तुटणे, ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड होणे आदी बिघाड वरचेवर होतच असतात. गेल्या काही दिवसांमध्ये रूळ तुटण्याचे प्रमाण तर दर पंधरा दिवसांमध्ये पाच वेळा एवढे वाढले आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानकात रूळ तुटल्याने एका लांबपल्ल्याच्या गाडीचे डबे घसरले होते. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. या रुळांची तपासणी केली असता त्यात दोष असल्याचे तत्कालीन महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी सांगितले होते. थंडीच्या दिवसांमध्ये तापमानातील फरकामुळे हे तडे जात असल्याचे रेल्वेतर्फे सांगितले जाते. प्रत्यक्षात रुळांखालील खडीची कमतरता असल्याने रूळ तुटतात. हे कारण रेल्वे अधिकारी लपवतात.

या लपवाछपवीमुळेच ‘घातपाताच्या प्रयत्नां’बद्दल संशय व्यक्त करण्याची वेळ आली आहे. हा प्रत्येक प्रयत्न लोको पायलट किंवा मोटरमन यांच्या सतर्कतेमुळे फोल ठरला. घातपात घडवणारे ‘दहशतवादी’ किंवा समाजकंटक त्यांच्या एकाही प्रयत्नात यशस्वी ठरले नाहीत, हे आपले सुदैव आहेच. पण त्याचबरोबर या तीन-चार प्रकारांमागे नेमका कोणाचा हात होता, याचा शोध घेणेही पोलीस यंत्रणेला शक्य झालेले नाही, हेदेखील सत्य आहे.

घातपाताच्या कारवाया टाळण्यासाठी आता एक यंत्र प्रत्येक गाडी जाण्याआधी त्या मार्गावरून चालवले जाणार असल्याची घोषणा सुरेश प्रभू यांनी केली. या यंत्रामुळे रेल्वेरुळाला गेलेले तडे, रुळांवर

पडलेले अडथळे आदी गोष्टी सहज लक्षात येणार असल्याचेही सांगितले जात आहे. कोणत्याही निमित्ताने का होईना, पण प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वेने हा उपाय केला आहे. रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित होऊन भविष्यात हे ‘घातपाता’चे प्रकार घडू नयेत, हीच इच्छा!

रोहन टिल्लू – @rohantillu

tohan.tillu@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Railway safety issue cracks in railway tracks central railway railway minister suresh prabhu