वेगवान वाऱ्यामुळे नुकसान

मुंबई :  चक्रीवादळाची वेळेवर पूर्वसूचना मिळालेली असल्यामुळे सोमवारी पालिका रुग्णालयात रुग्णांची वर्दळ कमी होती. त्यामुळे रुग्णसेवेवर विशेष परिणाम झाला नाही. परंतु लसीकरण आणि चाचण्यांसाठी रुग्णालयात उभारलेले तात्पुरते मंडप वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी मोडून पडले, तर काही ठिकाणी झाडे पडल्याने नुकसान झाले आहे.

पालिका रुग्णालयात बाह््यरुग्ण विभागासह दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही सोमवारी अगदी कमी होती. पाऊस आणि वाहतुकीवर परिणाम झाल्याने दुपारच्या पाळीतील काही कर्मचारी पावसामुळे पोहचू शकले नाहीत. मात्र, रुग्णसेवेवर विशेष परिणाम झाला नाही. केईएमधील दोन खूप जुनी झाडे मुळासकट पडल्याने काही गाड्यांचे मात्र नुकसान झाले आहे, असे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.

बॉम्बे सेंट्रल येथील नायर रुग्णालयाबाहेरचा रस्ता आणि प्रवेशद्वाराजवळ पाणी साठल्याने रुग्णांसह कर्मचाऱ्यांना मात्र ये-जा करणे अडचणीचे झाले. रुग्णालयाच्या आवारातही काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्यानेही रस्ते बंद झाले. नायरमध्ये रुग्णाच्या चाचण्या करण्यासाठी उभारलेले तात्पुरत्या मांडवांचा काही भाग वाऱ्यामुळे कोलमडून पडला आहे. परंतु सोमवारी रुग्णसंख्या फार कमी असल्याने कोणालाही इजा झालेली नाही. चाचणी करण्याची सुविधा तातडीने आपत्कालीन विभागात हलविण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दहिसरच्या करोना केंद्रातही लसीकरणासाठी तात्पुरते उभारलेले मांडव कोसळले, अशी माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिली.

प्रवासासाठी यातायात

सकाळच्या सत्रातील कर्मचारी वेळेत पोहोचले. परंतु शहर आणि उपनगरांतील मुसळधार पावसामुळे दुपारच्या सत्रातील कर्मचारी पोहचू शकले नाहीत, तर कोणत्याही परिस्थितीत कामावर पोहोचण्याची धडपड करून काही कर्मचारी उशिरा पोहोचले. परंतु काही कर्मचारी रुग्णालयाच्या आवारातच राहत असल्यामुळे फारसा परिणाम झालेला नाही, असे शीव रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.