मुंबई : राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला असून अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. इतर भागातही पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस संपूर्ण राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्र , विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. राज्यात गुरुवारी सकाळपासून सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत होता. कोकणात पावसाचा जोर सर्वाधिक होता.
मोसमी पावसाच्या सुरुवातीच्या टप्प्यात चांगला पाऊस पडला आहे. कोकणात सामान्यपेक्षा जास्त पाऊस, तर मध्य महाराष्ट्रात सामान्य पाऊस झाला. मराठवाडा, विशेषतः विदर्भात अद्याप तुलनेने कमी पाऊस आहे. कोकणात बुधवारपर्यंत ४८४.२ मिमी(३४ टक्के )पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच हा पाऊस सामान्यपेक्षा अधिक आहे. मध्य महाराष्ट्रात १०८.५ मिमी (२४ टक्के) तर विदर्भात सर्वात कमी ३३.३ मिमी(-६२ टक्के ) पावसाची नोंद झाली.
गुजरात आणि परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र राजस्थानकडे सरकले आहे. तर पश्चिम बंगाल आणि परिसरावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकत असून, झरखंडकडे येण्याची शक्यता आहे. या कमी दाब क्षेत्रामुळे गुजरात महाराष्ट्रासह पश्चिम किनारपट्टी आणि पूर्व भारतात ढग जमा झाले असल्याने पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले. राज्यात पुढील चार ते पाच दिवस सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात शुक्रवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भात गडगडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मोसमी वाऱ्यांची वाटचाल सुरू
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी गुरुवारी बिहार आणि उत्तर प्रदेशात वाटचाल केली आहे. अरबी समुद्रातील सीमा बुधवारच्या भागातच होती. मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मोसमी वारे राजस्थानचा काही भाग, मध्य प्रदेश, आणि बिहारचा उरलेला भाग, उत्तर प्रदेशचा काही भाग व्यापतील. तसेच पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात मोसमी वारे दाखल होण्यास अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.