मुंबई : हिंदी सक्तीला विरोध करणारे महाराष्ट्र नवनि्र्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी तीन वकिलांनी राज्य पोलीस महासंंचालकांकडे केली आहे. मनसे अध्यक्ष व कार्यकर्त्यांकडून इतर राज्यातील नागरिकांवर भाषेवरून होणारे हिंसाचार, धमक्या व अपमान याविरोधात कायदेशीर तक्रार करण्यात आली असून त्यांच्याकडून राष्ट्रीय सुरक्षा कायदा व भारतीय न्याय संहिता कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, मनसे कार्यकर्ते इतर राज्यातून आलेल्या नागरिकांना भाषेवरून मारहाण करतात. अत्याचार व सार्वजनिक अपमानाच्या घटना घडल्या आहेत. ही एक गंभीर आणि संविधानविरोधी परिस्थिती आहे. ५ जुलै रोजी राज ठाकरे यांनी वरळी येथील जाहीर सभेत केलेल्या भाषणात भडकवणारी, द्वेषमूलक आणि उत्तेजक विधाने केली. त्यांनी इतर राज्यांतील लोकांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली.

विशेषतः परप्रांतीयांबाबत घडलेल्या अशा कोणत्याही घटनेचे पुरावा म्हणून चित्रिकरण करू नका, असे राज ठाकरे यांनी सांगितले. हे वक्तव्य स्पष्टपणे एका गंभीर आणि पूर्वनियोजित गुन्ह्याला सहकार्य करणारी व त्यास प्रोत्साहन देणारी आहे व तसेच पुरावा नष्ट करण्याचा किंवा लपवण्याचा उद्देश स्पष्ट होत आहे. त्यामुळे भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली ते वक्तव्य गुन्हेगारी स्वरूपाचे आहे, असे तक्रारीत नमूद केले आहे. तसेच या भाषणामुळे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते खूपच आक्रमक झाले आणि त्यांनी इतर राज्यांतील नागरिकांविरुद्ध आंदोलनात्मक कारवाया सुरू केल्या.

देशाच्या एकतेला बाधा

हे हल्ले म्हणजे राज्य घटनेच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असून राज्य घटनेतील विविध कलमांच्या विरोधात आहे. या कृत्यांमुळे देशाची एकता व अखंडता धोक्यात येत आहे. ही कृत्ये भारतीय न्याय संहिता कलम १९२ (धर्म,जात, भाषेच्या आधारावर द्वेष पसरवणे), ३५३ (सार्वजनिक शांतता भंग करणारे विधान करणे), ३५१ (२), ३५१ (३)( गंभीर धमकी देणे) व ६१ (२) ( कट रचणे) याचे उल्लंघन असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, हल्ले करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल करावे. राष्ट्रीय सुरक्षा कायदा १९८० अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंकजकुमार मिश्रा, नित्यानंद शर्मा व आशिष राय या तीन वकिलांनी पत्र लिहून महासंचालकांकडे याबाबत कारवाईची मागणी केली आहे. राज ठाकरे यांच्या भाषणाची लिंक, मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याच्या बातम्या पत्राबरोबर जोडण्यात आल्या आहे. ही लेखी तक्रार सोमवारी महासंचालक कार्यालयात देण्यात आली आहे.