मुंबई : बंदी असतानाही ‘रॅपिडो’ बाइक टॅक्सी सुरू असल्याने कारवाईचा आदेश देणारे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुत्राच्या पुढाकाराने होत असलेल्या प्रो-गोविंदा लीगसाठी ‘रॅपिडो’ कंपनीचे प्रायोजकत्व घेण्यात आले. मंत्र्यांनी कारवाईचे नाटक करून प्रायोजकत्व लाटल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

प्रताप सरनाईक यांनी मुंबईतील रस्त्यांवर बेकायदा ‘रॅपिडो’ (बाइक टॅक्सी) धावत असल्याचे उघडकीस आणून गुन्हे दाखल केले होते. त्याच ‘रॅपिडो’चे प्रायोजकत्व प्रताप सरनाईक फाउंडेशनने ‘प्रो गोविंदा लीग २०२५’ साठी घेतले आहे. सरनाईक यांचा हा प्रताप उघडकीस आल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.

प्रताप सरनाईक यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात पुढाकार घेऊन रॅपिडो (बाइक टॅक्सी) बेकायदा धावत असल्याचे उघडकीस आणून गुन्हे दाखल केले होते. मात्र, प्रताप सरनाईक फाउंडेशनने आयोजित केलेल्या प्रो-गोविंदा लीग २०२५ साठी ‘रॅपिडो’चे प्रायोजकत्व घेतल्याचे समोर आले आहे. शिवाय लीगचे उद्घाटन मंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत झाले आहे. या कार्यक्रमाची छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याबद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. ‘कारवाई करण्याचा देखावा करून रॅपिडोचे प्रायोजकत्व मिळविल्याबद्दल परिवहनमंत्र्यांचे अभिनंदन केले पाहिजे असा टोला त्यांनी लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) सरचिटणीस रोहित पवार यांनाही ‘रॅपिडो बाइक आली. खुद्द मंत्र्यांनी अडवून कारवाई केली. बातम्या झाल्या, प्रसिद्धी मिळाली. मंत्र्यांनी रॅपिड भूमिका बदलली आणि शेवटी प्रायोजकत्व मिळविले. हा मंत्रीपदाचा गैरवापर तर नाही ना?, असा सवालही पवार यांनी केला आहे.