मुंबई : जे.जे. रुग्णालयातील बालरोग विभागामधील एका निवासी डॉक्टरने १६ जुलै रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यानंतर विभागातील अन्य निवासी डॉक्टरांनी आंदोलन पुकारले आहे. मात्र या महिला निवासी डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी विभागप्रमुखांना आपण मानसिक तणावाखाली असून, मला तुमच्या मदतीची आवश्यकता असल्याचा संदेश भ्रमणध्वनीवर पाठवला होता. मात्र त्याकडे विभागप्रमुखांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप बालरोग विभागातील निवासी डॉक्टरांनी केला.

दरम्यान, मी घरी असताना संबंधित डॉक्टरने मला संदेश पाठविला होता. पण मी तिला व्हॉट्स ॲपवर प्रतिसाद देण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून तिच्याशी बोलण्याचा निर्णय घेतला होता, असे विभागप्रमुख डॉ. बेला वर्मा यांनी सांगितले.

मी घरापासून दूर आहे आणि माझे कुटुंब जवळ नाही. माझ्या आईला घरी कर्करोग झाला आहे. मी मानसिक तणावाखाली असल्याने त्यावरील उपचारही घेत आहे. मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. मला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासही त्रास होत असून, मला तुमच्या मदतीची गरज आहे, असा जवळपास ३०० शब्दांचा व्हॉट्स ॲप संदेश या महिला डॉक्टरने विभागप्रमुखांना पाठविला होता. त्यावर विभाग प्रमुखांनी कोणतेही उत्तर दिले नाही. तसेच हा संदेश पाठवल्याच्या दुसऱ्या दिवशी त्या महिला डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर विभागातील सर्व डॉक्टरांनी तिची चौकशी केली, परंतु विभागप्रमुख एकदाही त्या डॉक्टरला पाहण्यासाठी आल्या नसल्याचा आरोप केला.

आत्महत्या करणारी मुलगी हुशार असून, ती तिचे काम व्यवस्थित पूर्ण करीत होती. तरीही तिला तीन – चार मेमो देण्यात आले आहेत. तिचा मानसिक छळ होत असल्याने तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र यानंतरही विभागप्रमुखांनी त्यांची चूक मान्य करून माफी मागितली असती, तर आम्ही हे प्रकरण लावून धरले नसते. मात्र विभागप्रमुख त्या डॉक्टरबाबत चुकीची माहिती पसरवत होत्या. त्यामुळे अखेर आम्हाला आंदोलनाचा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती जे.जे. रुग्णालयातील बालरोग विभागातील निवासी डॉक्टरांनी दिली.

मागील आठ महिन्यांपासून तिला प्रबंध पूर्ण करण्यास सांगण्यात येत होते. मात्र तिने अद्यापपर्यंत तो पूर्ण केलेला नाही. ती अतिदक्षता विभागामध्ये कार्यरत असूनही रुग्णांकडे व्यवस्थित लक्ष देत नसल्याने तिची बदली नवजात शिशू अतिदक्षता विभागात डॉ. सुशांत माने यांच्या नेतृत्त्वाखाली करण्यात आली होती. मात्र तेथेही ती व्यवस्थित काम करत नसल्याने त्यांनी तिला सहा महिन्यांमध्ये चार मेमो दिले. तसेच त्यांनी तिच्याबाबत माझ्याकडे तक्रारही केली होती. या मुलीचा प्रबंध पूर्ण झाला नसल्याने तिला परीक्षेला बसता येणार नाही, तसेच तिच्या आईला कर्करोग असल्याने तिला तिच्यासाठी घरी जायचे होते आणि तिचा अभ्यास झाला नसल्याने तिला परीक्षेत अनुत्तीर्ण होईल याची भीती वाटत असल्याने तिने हे पाऊल उचलले असावे, असे डॉ. बेला वर्मा यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिने पाठविलेल्या संदेशमध्ये आम्ही घरापासून दूर असल्याने तुम्ही आमचे पालक आहात. आम्हाला काही समस्या असल्यास आम्ही तुमच्याशीच बोलणार, पण तुम्ही माझे ऐकत नाही. असे म्हटले होते. कामावरून घरी गेल्यावर वयस्क आईची काळजी घ्यायची असल्याने मी फोनला हात लावत नाही. रात्री उशीरा तिचा संदेश पाहिल्यावर तिला उत्तर देण्याची इच्छा झाली. परंतु व्हॉट्स ॲपवर उत्तर देण्याऐवजी प्रत्यक्ष भेटून तिच्याशी बोलण्याचा निर्णय मी घेतला. दुसऱ्या दिवशी कामाच्या व्यापात तिच्याशी बोलता आले नाही, मात्र तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे कळल्यानंतर मी तिची वारंवार चौकशी करीत होते, असेही डॉ. वर्मा यांनी सांगितले.