मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपीने कपडे बदल्याची बाब उघडकीस आली आहे. सैफच्या घरातून बाहेर पडताना व वांद्रे लकी हॉटेल येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणात आरोपीने कपडे बदलल्याचे निष्पन्न झाले. सध्या त्याचा शोध घेण्यासाठी विविध पथके मुंबईसह इतर ठिकाणी फिरत आहेत. तसेच आरोपीला पकडण्यासाठी ३० पथकेही तैनात आहेत. परंतु सैफच्या इमारतीच्या दोन्ही प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक असताना आरोपी इमारतीत कसा शिरला, असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर आहे.

आरोपीने सैफवर हल्ला केला, त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर मुखपट्टी व टोपी होती. पण इमारतीतून खाली उतरताना त्याने मुखपट्टी व टोपी का काढली असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे. आरोपीने पोलिसांचा समेमिरा चुकवण्यासाठी कपडेही बदलले. सुरुवातीला सैफच्या घरातून बाहेर पडताना त्याने काळ्या रंगाचे टी-शर्ट घातले होते. पण नंतर त्याने कपडे बदलल्याचे चित्रीकरण पोलिसांच्या हाती लागले आहे. सैफवर हल्ला केल्यानंतर बराच काळ आरोपी वांद्रे परिसरातच फिरत होता. त्यावेळी त्याने कपडे बदलून आकाशी रंगाचा शर्ट परिधान केला. वांद्रे येथील लकी हॉटेलजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपी आकाशी रंगाचे शर्ट घाऊन जात असताना दिसत आहे. तो वांद्रे स्थानकाजवळ गेल्याचा पोलिसांना संशय़ आहे.

हेही वाचा >>> मुंबई मॅरेथॉनच्या मार्गावर प्रदूषणाची ‘धाव’

दरम्यान, सीसीटीव्हीतून आरोपीची ओळख पटली असून, तो सराईत असल्याचे वाटत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांसह गुन्हेशाखाही समांतर तपास करीत असल्याची माहिती देण्यात आली.

हल्लाप्रकरणात गुन्हेगारी टोळीचा हात नाही – गृह राज्यमंत्री

पुणे : चित्रपट अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यात गुन्हेगारी टोळीचा हात नसल्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, चोरीच्या उद्देशाने हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले. कदम यांनी शुक्रवारी पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधला.

मौल्यवान वस्तूंची चोरी नाही : करिना

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला, त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपासणी केली असून घरातून कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीला गेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी याबाबत सैफची पत्नी अभिनेत्री करिना कपूरकडूनही पडताळणी केली. त्यावेळी तिनेही त्याला दुजारा दिल्याचे सूत्रांनी सांगितले. आरोपीपासून काही अंतरावरच दागिनेही होते, पण त्यातील सर्व दागिने तेथेच असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले आहे.

कपड्यांवर रक्ताचे डाग, चालणेही मुश्कील

● अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्याचे कपडे रक्ताने माखले होते. त्यावेळी त्याला चालणेही कठीण होत होते, अशी माहिती सैफला रिक्षातून लीलावती रुग्णालयात नेणारा रिक्षाचालक भजन सिंहने दिली. भजन सिंह गुरुवारी पहाटे प्रवासी आणण्यासाठी वांद्रे परिसरातून जात होता. त्याच वेळी वांद्रे पश्चिम येथील सतगुरू शरण सिंह इमारतीखाली त्याची रिक्षाला थांबवण्यात आली.

● सैफच्या घरातील एका कर्मचाऱ्याने हात केला. त्यावेळी एक व्यक्ती जखमी असून त्यांना रुग्णालयात न्यायचे असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. जखमी व्यक्ती (सैफ), एक कर्मचारी आणि एक लहान मूल (तैमूर) माझ्या रिक्षात बसले आणि मला रुग्णालयात नेण्यास सांगितले, असे भजन सिंह यांनी सांगितले. खार (पूर्व) येथील पाइपलाइन रोडवर राहणारे भजन सिंह म्हणाले की, त्यांनी माणुसकीच्या नात्याने कुटुंबाकडून पैसे मागितले नाहीत.

● रिक्षातील प्रवासी घाईत होते आणि घाबरलेही होते. त्यामुळे मी पैसे मागण्याचाही विचार केला नाही. एवढा मोठा अभिनेता माझ्या वाहनात बसला, ही समाधानाची गोष्ट होती, असे भजन सिंह यांनी सांगितले.

Story img Loader