scorecardresearch

राज्यभर सावरकर गौरवयात्रा, उद्धव ठाकरेंनी सावरकरप्रेम कृतीतून दाखवावे, शिंदे-फडणवीस यांचे आवाहन

सावरकरांचे हिंदूत्व मान्य असेल तर राहुल गांधी यांच्या कानाखाली मारण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हानही उभयतांनी ठाकरे यांना दिले.

mv eknath shinde devendra fadanvis
मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अवमान केल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अय्यर यांच्या प्रतिमेला थोबाडीत मारली होती. पत्रकार परिषदेत त्याचे छायाचित्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवले.

मुंबई: स्वातत्र्यंवीर सावरकर यांचे त्याग, देशभक्ती आणि एकूणच देशाप्रति समर्पण याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिवसेना- भाजपच्या वतीने राज्यभर सावरकर गौरवयात्रा काढण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली. तसेच सावरकरांवरील प्रेम भाषणातून नव्हे तर कृतीतून दाखविण्याची हिंमत उद्धव ठाकरे यांनी दाखवावी. सावरकरांचे हिंदूत्व मान्य असेल तर राहुल गांधी यांच्या कानाखाली मारण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हानही उभयतांनी ठाकरे यांना दिले.

स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे दैवत असून त्यांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी रविवारी मालेगाव येथील जाहीर सभेतून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान सहन करणार नाही, असा पोकळ दम ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिला. वस्तुत: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना आणि समाप्तीच्या वेळीसुद्धा दोन वेळा गांधी यांनी सावरकर यांना अपमानित करण्याची भूमिका घेतली. मात्र त्या वेळी ठाकरे आणि त्यांच्या आमदारांनी सभागृहात एक शब्द काढला नाही.

एवढेच नव्हे तर गांधी यांच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली असतानाही त्यांची खासदारकी वाचविण्यासाठी ठाकरे आणि त्यांचे आमदार काळय़ा पट्टय़ा लावून आघाडीच्या आमदारांसोबत आंदोलनात सहभागी होताना, त्यांना सावरकरांचा अपमान दिसला नाही. हा ठाकरे आणि त्यांच्या आमदारांच्या शरणागतीचा परमोच्च बिंदू होता, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी या वेळी केली. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांचा अवमान केल्यानंतर त्यांच्या प्रतिमेला थोबाडीत मारण्याची हिंमत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाखविली होती. तशीच हिंमत राहुल गांधी यांच्याबाबत उद्धव ठाकरे दाखवणार का,  असा सवाल केला.

अनेक क्षेत्रांमध्ये योगदान

सावरकर यांनी स्वातंत्र्य आंदोलनाव्यतिरिक्तही अनेक क्षेत्रांत अत्यंत मोलाचे योगदान दिले. जाती निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, मराठी भाषेचा गौरव, मराठी भाषेला अनेक शब्द देण्याचे काम अशा कितीतरी क्षेत्रांत त्यांनी योगदान दिले आहे. प्रत्येक देशवासी त्यांच्या अतुलनीय योगदानाचा ऋणी आहे.  देश आणि विशेषत: महाराष्ट्र त्यांचे योगदान कधीच विसरू शकणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र आणि देशाचे दैवत असलेल्या सावरकर यांचा राहुल गांधी यांनी केलेल्या अपमानाविरोधात राज्यातील सर्व विधानसभा क्षेत्रांत ‘वीर सावरकर गौरवयात्रा’ काढण्यात येतील आणि ठिकठिकाणी राहुल गांधी यांचा निषेध करण्यात येणार असल्याचेही शिंदे आणि फडणवीस यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 00:03 IST

संबंधित बातम्या