मुंबई : अठरा वर्षीय तरुणीची हत्या करून एकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उजेडात आली. मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहातील ही घटना असून, तेथील सुरक्षा रक्षकाने चर्नी रोड स्थानकाजवळ गाडीखाली उडी घेत आत्महत्या केली. तरुणीवर बलात्कार झाल्याचा संशय असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले महिला छात्रालय येथील चौथ्या मजल्यावरील खोलीमध्ये ही तरुणी राहात होती. ती बेपत्ता असल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी तपास केला असता, खोलीतच विवस्त्र अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आल्याची माहिती माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त (दक्षिण प्रादेशिक परिमंडळ) अभिनव देशमुख यांनी दिली. ओढणीने गळा आवळून या तरुणीची हत्या करण्यात आली. खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता. त्यामुळे बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा संशय असून,  शवविच्छेदन अहवालानंतर लैंगिक अत्याचार झाला होता का, ते स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, चर्नीरोड रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी सकाळी एका व्यक्तीने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली होती. तो वसतीगृहाचा सुरक्षा रक्षक ओमप्रकाश कनोजिया असावा, असा संशय पोलिसांना होता. कनोजियाच्या वडिलांनी मृतदेहाची ओळख पटवली असून सीसीटीव्हीवरून तो आरोपीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुलीची हत्या करून कनोजियाने आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. त्याच्या खिशात दोन चाव्या सापडल्या आहेत. गेल्या १५ वर्षांपासून अधिक काळ तो वसतिगृहात कामाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरी जायचेच राहिले..

मृत तरुणी मुळची अकोल्याची आहे. ती वांद्रे येथील एका प्रसिद्ध महाविद्यालयात पोलिटेक्निकलचे शिक्षण घेत होती. गेल्या वर्षभरापासून ती या वसतिगृहात राहत होती. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये ती गावी जाणार होती. त्यासाठी तिने रेल्वेचे तिकीटही काढले होते. मात्र त्याआधीच तिची हत्या झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.