मुंबई : बेस्टच्या विद्युत ग्राहकांकडून दोन महिन्याच्या विद्युत बिलाएवढी रक्कम अनामत म्हणून वसूल करण्यात येत असून त्याला शिवसेनेने विरोध केला आहे. अनामत रक्कम वसूल करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने मंगळवारी शिवडी परिसरात ठिकठिकाणी आक्रोश आंदोलन करण्याचे ठरवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेस्ट प्रशासनाने काही दिवसांपूर्वी अचानक विद्युत ग्राहकांना एक पत्रक पाठवून धक्काच दिला आहे. या पत्रकात म्हटले आहे की, वीज ग्राहकांना गेल्या बारा महिन्याच्या सरासरी विद्युत देयकाच्या दुप्पट रक्कमेएवढी अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ज्या वीज ग्राहकांची अनामत रक्कम निर्धारित रक्कमेपेक्षा कमी आहे, त्यांना दुप्पट अनामत रक्कम आणि जास्त असल्यास सरासरी अनामत रक्कम बेस्ट उपक्रमाकडे भरावी लागेल. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (एमईआरसी) विद्युतपुरवठा संहिता आणि प्रमाणनियामके २०२१ नुसार हा आदेश लागू करण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाचे म्हणणे आहे.

हेही वाचा – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सात न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होईल का? उज्वल निकम म्हणतात, “ठाकरे गटाची मागणी…”

मात्र बेस्टच्या या निर्णयाला राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. काँग्रेस, आम आदमी पार्टीपाठोपाठ आता शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुंबईत बेस्टचे दहा लाख विद्युत ग्राहक आहेत. मुंबईत अदानी, बेस्ट आणि महावितरण अशा तीन विद्युत वितरण कंपनी आहेत. शहर भागात बेस्टचे विद्युत ग्राहक जास्त असून त्यात मध्यमवर्गियांची संख्या मोठी आहे. शिवसेनेने या विरोधात मंगळवारी संध्याकाळी आक्रोश आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवडी परिसरातील भोईवाडा नाका, शिवडी नाका, परळ नाका (गौरीशंकर), भारतमाता नाका, अभ्युदय नगर नाका (आंबेवाडी समोर), करिरोड नाका, मुरलीधर सामंत मार्ग, प्रभादेवी स्थानकाजवळ अशा सात ठिकाणी संध्याकाळी ५.३० वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena protest against best shivdi mumbai mumbai print news ssb
First published on: 10-01-2023 at 11:17 IST