राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. यावेळी त्यांनी अद्याप अधिकृत घोषणा करणं बाकी असल्याचंही सांगितलं. दरम्यान यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे छत्रपती संभाजीराजेंवर निशाणा साधला.

शिवसेनेकडून संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी नाहीच; संजय पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब

संभाजीराजे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी उत्सुक असून त्यांनी शिवसेनेकडे पाठिंबा मागितला होता. मात्र शिवसेनेने पक्षप्रवेशाची अट ठेवलेली अट त्यांना अमान्य होती. त्यानंतर त्यांनी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे.

“दोन्ही जागा शिवसेना लढणार”

“संजय पवार यांचं नाव अंतिम झालं आहे. संजय पवार शिवसेनेचे मावळे असून उद्धव ठाकरेंनी या मावळ्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल,” असं संजय राऊत यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, “दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत, दोन्ही जागांवर शिवसेना लढेल आणि उमेदवार विजयी होतील”.

“मावळे असतात म्हणून राजे”

“कोल्हापूरचे संजय पवार हे अनेक वर्ष जिल्हाप्रमुख आहेत, कडवट शिवसैनिक आहेत. ते पक्के मावळे असून मावळे असतात म्हणून राजे असतात. पक्षनेते, पदाधिकारी हे मावळ्यांच्या जोरावर उभे असतात,” असंही संजय राऊत यांनी सांगितलं.

“कुटुंबाविषयी, गादीविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कायम आदर”

संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांशी आपलं बोलणं झालं असून आदर ठेवला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “नक्कीच सन्मान ठेवत आहोत. त्यांच्या कुटुंबाविषयी, गादीविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कायम आदर आहे. त्यासाठीच तर आम्ही सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार व्हा असा प्रस्ताव ठेवला. त्यांना राज्यसभेवर जायचं आहे, अपक्ष लढायचं आहे आणि त्यासाठी ४२ मतांची गरज आहे. जर कोणाकडे ४२ मतं असतील तर तो राज्यसभेवर निवडून येऊ शकतो. संभाजीराजे अपक्ष लढणार असतील तर त्यांच्याकडे मतांची काय योजना आहे माहिती नाही. पण प्रस्ताव आला तेव्हा गादी, छत्रपतींच्या वंशजाचा सन्मान लक्षात घेता शिवसेना उमेदवारी देईल, पक्षात प्रवेश करा असं सांगितलं होतं”.

संभाजीराजेंच्या समर्थकांकडून होणाऱ्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “आम्ही कोणाच्या प्रश्नांना उत्तर देण्यास बांधील नाही. त्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती नसावा. एकनाथ ठाकूर हे कडवट शिवसैनिक होते. ज्या सामनाच्या इमारतीखाली आपण बोलत आहोत त्यातही त्यांचा वाटा होता. प्रियंका चतुर्वेदीदेखील शिवसेनेच्याच उमेदवार आहेत. प्रितीश नंदी हेदेखील शिवसेनेचे उमेदवार होते”.

“महाराजांना पक्षाचं वावडं असू नये”

“शाहू महाराजसुद्धा पक्षाच्या तिकीटावर लोकसभा लढले आहेत. मालोजीराव भोसले हेदेखील पक्षाच्या तिकीटावर उमेदवारी घेऊन लढले आहेत. स्वत: संभाजीराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर कोल्हापुरातून निवडणूक लढले आहेत. त्यामुळे राजांना, महाराजांना पक्षाचं वावडं असू नये. देशभरातील अनेक राजघराण्याचे लोक आजही अनेक पक्षांच्या तिकीटावर राज्यसभेत, लोकसभेत आले आहेत,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आकडेमोड काय सांगते…

भाजपाच्या वतीने सहा वर्षांपूर्वी राज्यसभेवर संभाजीराजे यांची नामनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हाही संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणूनच सहा वर्षे खासदारकी भूषविली. या वेळीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. पण अपक्ष लढल्यास विजयाचे गणित जुळणे अशक्य आहे. भाजपकडे २२ अतिरिक्त मते असली तरी अतिरिक्त २० मते मिळविण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल.