मुंबई : दादरमधील शिवाजी पार्कवर गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्याची जय्यात तयारी सुरू आहे. या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी अपेक्षित आहे. राज्याबाहेरील नागरिकही या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याने पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग आणि आसपासच्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी या परिसरातील मार्गात बदल केले असून त्यासंदर्भातीस अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे.

दरवर्षी दसऱ्याला शिवाजी पार्कवर शिवसेनेचा (ठाकरे) मेळावा आयोजित करण्यात येतो. महापालिका निवडणुकीपूर्वी होणाऱ्या या मेळाव्याला यंदा विशेष महत्त्व आहे. हा मेळावा रद्द करून पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन भाजपाने केले आहे. त्यामुळे संतप्त झालेले शिवसैनिक मोठ्या संख्येने मेळाव्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. परिणामी, मेळाव्याला अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. सध्या या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय, अडथळा व धोका होऊ नये यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक बंदी व वळणांची अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना गुरूवार, २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.०० ते रात्री ११.५५ या वेळेत लागू राहील, असे वाहतूक पोलीस उपायुक्त (मुख्यालय व मध्य विभाग) डॉ. दिपाली थाटे यांनी या अधिसूचनेत नमूद केले आहे.

खालील रस्त्यांवर पार्किंग बंदी असेल

  • एस. व्ही. एस. रोड (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते यस बँकपर्यंत)
  • केळुसकर रोड (दक्षिण व उत्तर), दादर
  • एम. बी. राऊत रोड (एस. व्ही. एस. रोड जंक्शनपासून)
  • पांडुरंग नाईक मार्ग (एम. बी. राऊत रोड), दादर
  • दादासाहेब रेगे मार्ग (सेनापती बापट पुतळा ते गडकरी जंक्शन), दादर
  • दिलीप गुप्ते मार्ग (शिवाजी पार्क गेट क्र. ५ ते शीतलादेवी मंदिर जंक्शन)
  • एन. सी. केळकर मार्ग (गडकरी जंक्शन ते हनुमान मंदिर जंक्शन), दादर
  • एल. जे. रोड (राजाबढे जंक्शन ते गडकरी जंक्शन)

वाहनांसाठी प्रवेशबंदी व पर्यायी मार्ग

प्रवेशबंदी :

एस. व्ही. एस. रोड (सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते कपड बाजार जंक्शन, माहीम)
पर्यायी मार्ग: सिद्धिविनायक जंक्शन – एस. के. बोले रोड – आगर बाजार – पोर्तुगीज चर्च – गोखले रोड

राजाबढे चौक जंक्शन ते केळुसकर रोड (उत्तर) जंक्शन, दादर
पर्यायी मार्ग: जे. रोड – गोखले रोड – स्टीलमॅन जंक्शन – गोखले रोड

ले. दिलीप गुप्ते रोड (पांडुरंग नाईक मार्ग जंक्शनपासून दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांना बंदी)
पर्यायी मार्ग: राजाबाडे जंक्शन–एल. जे. रोड

गडकरी चौक जंक्शन ते केळुसकर रोड (दक्षिण), दादर
पर्यायी मार्ग: एम. बी. राऊत मार्ग

आवश्यकतेनुसार बंद करण्यात येणारे मार्ग

बाल गोविंदास मार्ग (पद्माबाई ठक्कर मार्ग जंक्शन – सेनापती बापट मार्ग ते एल. जे. मार्ग पश्चिमेकडे)
पर्यायी मार्ग: मनोहरमा नागरकर मार्ग

दादासाहेब रेगे रोड (सेनापती बापट पुतळा ते गडकरी जंक्शन)
पर्यायी मार्ग: एल. जे. रोड – गोखले रोड – रानडे रोड

नागरिकांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार पर्यायी रस्त्यांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.