मुंबई : पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सुरू केलेले कबुतरखाना शिवसेनेच्या (ठाकरे) शिवसैनिकांनी पहिल्याच दिवशी बंद पाडला. या ठिकाणी सध्या तरी एकही कबुतर नाही. असे असताना कबुतरखाना सुरू करून कबुतरांची पैदास वाढवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या (ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी केला. शिवसैनिकांनी कबुतरखाना परिसरात धडक देऊन कबुतरांसाठी टाकलेले धान्य गोळा केले व कबुतरखाना बंद करण्याचा प्रयत्न केला.
मुंबईतील कबुतरखान्यांचा वाद अद्याप संपुष्टात आलेला नसताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात एक नवीन कबुतरखाना सुरू करण्यात आला आहे. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीच या कबुतरखान्याचे अनावरण केले. संजय गांधी उद्यानाला लागूनच असलेल्या तीन मूर्ती येथील श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिरच्या आवारात हा कबुतरखाना सुरू करण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतील दादरचा कबुतरखाना बंद करण्यात आला आहे. त्यातच हा नवीन कबुतरखाना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून सुरू झाल्यामुळे नवीनच वाद सुरू झाला आहे. या नव्या कबुतरखान्याला शिवसेनेने (ठाकरे) विरोध केला असून हा कबुतरखाना बंद करण्यासाठी आंदोलन केले. बंदी आदेश असतानाही मंगल प्रभात लोढा यांच्या निधीतून तीन मूर्ती येथील जैन मंदिराच्या आवारात उभारलेल्या नव्या कबूतरखान्याचे उद्घाटन करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेने (ठाकरे) केला आहे.
मुंबईत कबुतरखान्यांना न्यायालयाने बंदी घातलेली असताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ नवीन कबुतरखाना उभारण्यात आल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने (उद्धव) मंगळवारी आंदोलन केले. शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर व माजी आमदार विलास पोतनीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी तीन मूर्ती, देवीपाडा येथील कबुतरखान्याला धडक देऊन कबुतरांना घातलेले खाद्य काढून टाकले व निषेध नोंदविला. या कबुतरखान्याला पर्यावरणप्रेमी, वन्यजीव अभ्यासक, तसेच राष्ट्रीय उद्यानातील अधिकारी यांनीही विरोध दर्शविला आहे.
हा भूखंड खाजगी असला तरीही संजय गांधी उद्यानाच्या इकोझोनमध्ये येत असून या परिसरात सध्या एकही कबूतर नाही. भविष्यात इथे कबुतरांची पैदास वाढली व कबुतरखाना तयार झाल्यास असंख्य कबूतरांचा वावर वाढण्याची शक्यता आहे. मंदिरापासून जवळच फरलेवाडी, तीन मूर्ती, देवीपाडा अशी मोठी लोकवस्ती आहे. भविष्यात कबुतरांची संख्या वाढल्यास येथील नागरिकांना त्रास होऊ शकतो, असे मत यावेळी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी व्यक्त केले.
या कबुतरखान्यामुळे वन्यजीवनावर दुष्परिणाम होऊ शकतो. राष्ट्रीय उद्यानात व परिसरात असे कृत्रिम खाद्य देण्याची व आपण पक्षांचे खाद्य ठरवण्याची गरज नाही. वैद्यकियदृष्ट्या कबूतरांमुळे विषाणुजन्य आजारांचा धोका होऊ शकतो. त्यामुळे कबुतरांचे अस्तित्व वाढल्यास संजय गांधी राष्ट्रीय उद्यान्यातील जैवविविधतेवरही परिणाम होऊ शकतो असेही घोसाळकर म्हणाले.
महापालिकेचे दुटप्पी धोरण
मुंबई महापालिका एका बाजूला कबुतरखाने बंद करत आहे, तर दुसरीकडे आर/ मध्ये विभागाने कबुतरखान्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे याबाबतही महापालिका आयुक्तांनी आपले धोरण स्पष्ट करावे, असे आवाहन घोसाळकर यांनी केले. दरम्यान, याबाबत पालिकेच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.