लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदाची सूत्रे श्रावण हर्डीकर यांनी बुधवार, ३ मे रोजी सकाळी स्वीकारली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्याकडून हर्डीकर यांनी पदभार स्वीकारला.

मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सह आयुक्त (सामान्य प्रशासन) मिलिन सावंत यांनी हर्डीकर यांचे स्वागत केले. यावेळी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, उपआयुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

हर्डीकर हे भारतीय प्रशासन सेवेतील २००५ च्या तुकडीतील अधिकारी आहेत. पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविदयालयातून बी. इ. इन्स्ट्रूमेंटेमेशन ही पदवी त्यांनी संपादीत केली. २००४ मध्ये त्यांची भारतीय राजस्व सेवेत निवड झाली, त्यानंतर २००५ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत ते संपूर्ण भारतातून सातव्या क्रमांकाने तर महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

आणखी वाचा- बेस्टला ८०० कोटींचे अर्थबळ, कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनसही मिळणार

प्रशासकीय सेवेच्या प्रारंभी हर्डीकर यांनी कोल्हापूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी, दापोलीचे (रत्नागिरी) सहायक जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली. त्यानंतर नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. तसेच यवतमाळचे जिल्हाधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांवर जबाबदारी सांभाळल्यानंतर नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, पिंपरी-चिचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी कामकाज करताना विशेष ठसा उमटविला. त्यानंतर ते नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक म्हणून कार्यरत होते.

आणखी वाचा- कृत्रिम शीतपेयांऐवजी उसाच्या रसाला अधिक पसंती; उसाच्या रसाच्या विक्रीत तिप्पटीने वाढ

आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. राज्य शासनाकडून २०११-१२ मध्ये ‘सर्वोत्तम जिल्हाधिकारी’ या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच केंद्र सरकारचा प्रशासकीय सुधारणा, निवृत्तीवेतन आणि तक्रार निवारण विभागाकडून उत्कृष्टरित्या नागरी सेवा पुरविल्याबद्दल त्यांना राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सुवर्ण पदक बहाल करण्यात आले. नागरी वाहतूक नियोजन क्षेत्रात हर्डीकर यांनी राबवलेल्या प्रकल्पाला उत्कृष्ट प्रकल्प म्हणून केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी मंत्रालय व जागतिक बँक यांनी २०१६ मध्ये पुरस्कार प्रदान केला.

लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी (मसूरी) येथे प्रशिक्षण घेत असताना उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना रिना स्मृती सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. तसेच २०१९ मध्ये त्यांचा पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shravan hardikar has accepted the charge of additional municipal commissioner mumbai print news mrj
First published on: 03-05-2023 at 21:09 IST