मुंबई : विद्यार्थी निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये ३० ऑगस्ट रोजी प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान घेण्यात येणार आहे. त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. विद्यापीठ विद्यार्थी परिषद ३० सप्टेंबरपासून कार्यरत होणार आहे.

राज्यातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये तब्बल २६ वर्षांनी विद्यार्थ्यांच्या निवडणुका होणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या क्षेत्रातील महाविद्यालये आणि विभागांचे निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. निवडणुकीची प्रक्रिया ९ ऑगस्टपासून सुरू होणार असून सप्टेंबरअखेपर्यंत चालणार आहे. महाविद्यालय आणि विभाग स्तरावर विद्यार्थी आपले प्रतिनिधी निवडू शकतील. त्यासाठी ३० ऑगस्ट रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी निकालही जाहीर होईल. त्यानंतर विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आणि सचिवांची निवडणूक होणार असून त्यासाठी २४ सप्टेंबर रोजी मतदान होईल. महाविद्यालय आणि विद्यापीठ विभागांमधून निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष आणि सचिव, मागास प्रवर्ग प्रतिनिधी आणि महिला प्रतिनिधी यांची निवड करण्यात येईल.

या निवडणुकीची आचारसंहिता २० ऑगस्टपासून लागू होणार आहे. कोणतीही राजकीय संघटना, पक्षाच्या छत्राखाली कार्यरत असलेल्या संघटना या निवडणुकीत थेट सहभागी होऊ  शकणार नाहीत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे पॅनेल तयार करूनही निवडणुका लढवता येणार नाहीत. एखाद्या उमेदवारासाठी कोणत्याही राजकीय संघटनेचा हस्तक्षेप झाला तर त्याची उमेदवारी रद्द करण्याची तरतूद नियमांमध्ये आहे.

वेळापत्रक

* मागासवर्ग प्रतिनिधींच्या आरक्षणाची सोडत – १९ ऑगस्ट

* तात्पुरती मतदारयादी जाहीर करणे – २० ऑगस्ट

* मतदार यादीवर आक्षेप नोंदवणे – २१ आणि २२ ऑगस्ट (दुपारी ३ वाजेपर्यंत)

* अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे – २२ ऑगस्ट

* उमेदवारीअर्ज भरणे – २३ ऑगस्ट (सकाळी ११ ते सायंकाळी ५)

*  उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे – २८ ऑगस्ट

विभाग आणि महाविद्यालयांमध्ये मतदान – ३० ऑगस्ट (सकाळी ११ ते दुपारी ३)

* मतमोजणी आणि निकाल – ३० ऑगस्ट (दुपारी ४ वाजल्यानंतर)