गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी राष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहेत. आधी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या विधानावरून सत्ताधाऱ्यांनी आरोप-प्रत्यारोप केले. त्यापाठेपाठ त्यांना गुजरातमधील न्यायालयाने पंतप्रधानांच्या नावाचा चुकीचा उल्लेख केल्याप्रकरणी दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली. या सर्व घडामोडींचे पडसाद राज्य विधिमंडळातही उमटले. गुरुवारी विधिमंडळ परिसरात भाजपा आमदारांनी राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारण्याचा प्रकार घडल्यानंतर आजही त्यावरून गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. "त्या आमदारांना निलंबित करा" आज विधानसभेचं कामकाच सुरू होताच विरोधी बाकांवरच्या सदस्यांनी गदारोळ केला. नाना पटोलेंनी त्यावरून निलंबनाची मागणी केली. "काल अध्यक्षांनी सांगितलं होतं की सगळं तपासून कारवाई करतोय. उपमुख्यमंत्र्यांनीही सांगितलं होतं की त्या प्रकाराचं समर्थन करणार नाही. यासंदर्भातला निर्णय अपेक्षित आहे. काल त्यांनी जसं वर्तन केलं, तसंच उद्या आम्हीही करू शकतो. सभागृहाला मोठी परंपरा आहे. जे कुणी या प्रकारात असतील, त्यांना निलंबित करा", अशी मागणी नाना पटोलेंनी केली. "खोके-बोके म्हणता ते चालतं का?" दरम्यान, नाना पटोलेंच्या या मागणीवर आशिष शेलार यांनी टीका केली. "याच सदनाच्या पायऱ्यांवर मुख्यमंत्र्यांना खोके-बोके म्हणतात, तेव्हा काय होतं? मुख्यमंत्री संविधानिक पदावर बसलेले नाहीयेत का? मुख्यमंत्र्यांना खोके-बोके म्हटलं जातं ते कसं चालतं?" असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला. यादरम्यान, "मोदी चोर है" अशा घोषणाही विरोधी बाकांवरून दिल्या गेल्या. राहुल नार्वेकरांची मध्यस्थी हा वाद वाढू लागल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अहवाल तपासून निर्णय घेणार असल्याचं सभागृहाला सांगितलं. मात्र, त्यावरून समाधान न झाल्यामुळे सभागृगात गदारोळ कायम राहिला. यावर भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी संतप्त होत पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या विरोधकांवर आगपाखड केली. Maharashtra Breaking News Live: तुम्ही आमच्या पंतप्रधानांचा अपमान करत असाल, तर कोण ऐकून घेणार? – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुधीर मुनगंटीवारांची आगपाखड "देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. २३ कोटी मतदारांनी निवडून दिलंय. कुणाच्या औकातीत नाही हे. कुणाच्या भीकेवर ते पंतप्रधान झालेले नाहीत. पळपुट्या माणसाच्या पक्षानं मोदींना चोर म्हणणं सहन करणार नाही. ती तर बाहेरची भूमिका होती. पण सभागृहात मोदींना चोर म्हटलं गेलं आहे", मुनगंटीवार म्हणाले. यानंतर सभागृहाचं कामकाज दोन वेळा आधी २० मिनिटं आणि नंतर १५ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यानंतर यासंदर्भात शनिवारी सकाळी निकाल देणार असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाला सांगितलं.