मुंबई : क्रॉफर्ड मार्केट येथील मासळी विक्रेत्यांनी नुकतेच दोन आठवड्यांसाठी आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा केली होती. मात्र, क्रॉफर्ड मार्केटमधील छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडई प्रकल्पाच्या लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचे आरोप अद्यापही मासळी विक्रेत्यांकडून केले जात आहेत, असे असतानाच मुंबईतील मासळी विक्रेत्यांच्या आंदोलनाला धाकटी डहाणू येथील मासळी विक्रेत्यांनी पाठिंबा दिला आहे. रविवारी सभा घेऊन लिलाव प्रक्रियेत झालेल्या कथित घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मासळी विक्रेत्यांकडून करण्यात आली.
कॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडईची इमारत अतिधोकादायक घोषित झाल्यामुळे मुंबई महापालिकेने ही मंडई २०२१ मध्ये पाडून टाकली. मंडईतील मासळी व्यावसायिकांचे पुनर्वसन जवळच्याच ज्योतिबा फुले मंडईत करण्यात येणार आहे. फुले मंडईच्या पुनर्विकासाचे काम सध्या सुरू आहे. त्यातच आता मुंबई महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या जागेची लिलावाद्वारे विक्री केली आहे. त्यामुळे मासळी व्यावसायिकांनी मूळ मंडईच्या विक्रीस विरोध केला आहे.
फुले मंडईतील जागा मासळी विक्रेत्यांसाठी अपुरी असल्याचे मासळी विक्रेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवाजी महाराज मंडईची जागा मच्छीमार संघटनेला विकत द्यावी, असाही प्रस्ताव पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यातच या लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप मच्छीमार संघटनेने केल्यामुळे प्रकरण तापले आहे. त्यामुळे मासळी विक्रेत्यांनी आंदोलनाचा घेतलेला निर्णय नितेश राणे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलला. मात्र, दोन आठवड्यांत तोडगा काढण्यात आला नाही, तर रस्त्यावर उतरण्याचा, इशारा संघटनांनी दिला आहे.
दरम्यान, मुंबईतील मासळी विक्रेत्यांच्या या आंदोलनाला धाकटी डहाणू येथील मासळी विक्रेत्यांनी पाठिंबा दिला आहे. डहाणूत रविवारी ‘करेंगे या मरेंगे’च्या घोषणा देत सभा आयोजित करण्यात आली. तसेच, पालिकेच्या मंडई स्थलांतराच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. पुढील आठवड्यात पालघर, ठाणे, मुलुंड, भांडुप, नवी मुंबई, उत्तन, गोराई, मनोरी, मार्वे, मालवणी, वसई, अर्नाळा, वर्सोवा, कुलाबा, कफ परेड, खारदांडा आणि जुहू गावांमध्ये सभा आयोजित करून या आंदोलनाला बळकटी देण्यात येणार आहे.
कोळी समाजाच्या हक्कांचे पूर्ण संरक्षण होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार सभेत करण्यात आला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज मंडईच्या लिलाव प्रक्रियेत झालेल्या कथित घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. या सभेत अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल, पालघर जिल्हा अध्यक्ष विनोद पाटील, पालघर जिल्हा उपाध्यक्ष संतोष मर्दे आणि पालघर जिल्हा सरचिटणीस कुंदन दवणे आदी उपस्थित होते.