ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतील एकहाती साम्राज्याला उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निकालामुळे एकप्रकारे हादरा बसला आहे.
ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टयातील महापे येथील बावखळेश्वर मंदिर, त्यालगत असलेला दगडखाणीचा विस्तीर्ण परिसर आणि सेन्ट्रल बिझनेस डिस्ट्रीक्ट (सीबीडी) म्हणून नावाजलेल्या बेलापूर येथील खाडी किनाऱ्याजवळ रेतीबंदरावर उभारण्यात आलेले ‘ग्लास हाउस’ ही नाईकांच्या नवी मुंबईतील साम्राज्याची प्रतीके मानली जातात.
नवी मुंबईतील ‘नाईकशाही’ची बरीचशी सूत्रे या दोन ठिकाणांहून हलवली जातात. बेकायदा पायावर उभी राहिलेली ही ‘नाईकशाही’ची प्रतीके न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे चांगलीच अडचणीत सापडली आहेत.
घरात मंत्रीपद, एक मुलगा आमदार, तर दुसरा खासदार, पुतण्या महापौर असे नाईकांचे नवी मुंबईत सम्राज्य आहे. महापे येथील दगडखाण (बावखळेश्वर मंदिर परिसर) आणि बेलापूर येथील ग्लास हाऊस ही या साम्राज्याची दोन प्रमुख ठाणी . नवी मुंबई महापालिकेत नाईकांची १५ वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर उभ्या राहिलेल्या ‘ग्लास हाऊस’चे बेकायदा बांधकाम अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांना कसे दिसले नाही, याचे कुणालाही आश्चर्य वाटत नाही.
‘दादा’ आणि त्यांच्या समर्थकांपुरता वावर असलेल्या या ग्लास हाऊसच्या पायथ्यापर्यत महापालिकेने कोटय़वधी रुपयांचा खर्च करून रस्ते बांधले आहेत. उलव्याच्या खाडीलगत रेती बंदरावर याच ग्लास हाऊसशेजारी खाडीत उभ्या असलेल्या आलिशान अशा बोटींचा ताफा कुणाचा आहे, हेसुद्धा आता गुपित राहिलेले नाही.
‘दादां’च्या या आलिशान बेटावर मुंबईतील बडे उद्योजक, क्रिकेटपटु, चित्रपट कलावंत कसे उतरतात आणि त्यांचा समुद्रविहार कसा घडतो, याचे किस्सेही मोठय़ा चवीने चर्चिले जात असतात. नेरुळ येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर आयपीएल सामने खेळावयास येणारा बडा क्रिकेटपटु वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ‘गेट वे ऑफ इंडिया’पासून बोटीतून निघायचा आणि येथून स्टेडियम गाठायचा.  मंत्रालयातील बैठकांसाठी ग्लास हाऊसवरुन निघालेली ‘साहेबां’ंची स्वारी बोटीनेच (यार्ट) मुंबई गाठते.
बेकायदा पायावर पोसल्या गेलेले आलिशान असे ग्लास हाउस किंवा महापे येथील दगडखाणींच्या जागेवर उभा राहीलेली मंदिरे असोत, नवी मुंबईतील एकाही राजकीय नेत्याने याविरोधात चकार शब्दही उच्चारण्याची िहमत कधी दाखविली नाही.
नाईक यांचा काय संबंध?
बेलापूर येथील ग्लास हाऊसशी गणेश नाईक यांचा काडीचाही संबंध नसल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. त्यामुळे हे बांधकाम नाईकांच्या साम्राज्याचे प्रतीक आहे हे म्हणणे योग्य नाही, असा दावा महापालिकेतील एका नाईकसमर्थक पदाधिकाऱ्याने लोकसत्ताशी बोलताना केला. याविषयी वारंवार प्रयत्न करुनही स्वत: नाईक प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.
ग्लास हाऊस कोणाचे?
‘ग्लास हाऊस’ बंगला नेमका संतोष तांडेल यांच्या मालकीचा की नाईक यांच्या मालकीचा अशी विचारणा न्यायालयाने केली. परंतु आपला या ‘ग्लास हाऊस’शी संबंध नसल्याचा पवित्रा नाईक यांनी घेतला. त्यावर जर हा बंगला नाईक यांचा नाही, तर ऑक्टोबर ते डिसेंबर २०११ या कालवधीत ७२ वेळा नाईक यांनी तेथे जाण्याचे कारण काय, असा सवाल न्यायालयाने केला. त्यावर नाईक निरुत्तर झाले.

Story img Loader