‘लोकसत्ता लोकांकिका’साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोगत

रंगमंचावर उभे कसे राहावे, उच्चार, दृश्याचा परिणाम म्हणजे काय अशा नाटकाचा गाभा असलेल्या संकल्पनांची ओळख करून देण्यासाठी एकांकिका आणि ‘लोकसत्ता लोकांकिका’सारखे व्यासपीठ अतिशय महत्त्वाचे ठरत असल्याचे मत या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. केवळ नाटकासाठीची शिकवणच यातून मिळते असे नाही तर यातून जगण्यासाठीचे धडेही या अनुभवातून मिळतात, अशी भावना खालसा आणि सिद्धार्थ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून विभागीय अंतिम फेरीत गुरू नानक खालसा आणि सिद्धार्थ आनंद भवन महाविद्यालयाच्या संघाने स्थान पटकावले आहे. स्पर्धा जिंकण्याचा चंग बांधून अंतिम फेरीची तयारी महाविद्यालयांमध्ये उत्साहात सुरू आहे. स्पर्धेच्या पलिकडे जाऊन या प्रक्रियेतून खूप काही शिकायला मिळाल्याचे कलाकार सांगतात. ‘नाटकाने आम्हाला काय शिकवले?’ यावर मुळात विचार करायला शिकवले असे उत्तर स्पर्धक देतात. महिना-दोन महिने चालणाऱ्या तालमींमधून नाटक, सादरीकरण या पलीकडे जाऊन एकमेकांकडून शिकण्याचा विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू आहे. वेळेचे व्यवस्थापन, निरीक्षण, महिनाभर रोज तालीम करताना अगदी आवाजाची काळजी कशी घ्यायची, आरोग्याची काळजी कशी घ्यायची, येणाऱ्या परिस्थितीला तोंड देत आपल्या सरावावर लक्ष केंद्रित कसे करायचे, संहितेतील प्रत्येक घटकामागचा विचार समजून घ्यायचा आणि त्यासाठी व्यक्ती, प्रसंग यांबाबत माहिती घ्यायची, गरजेनुसार भाषेच्या लहेजाचा वापर यांचा अभ्यास करायचा असा मोठा अभ्यासक्रम या नाटय़वेडय़ांचा आहे.

सिद्धार्थ आनंदभवन महाविद्यालयाच्या तळघरात नाटय़वेडय़ांचा सराव सुरू आहे. एरवी शाळेच्या पुस्तकातील कविता पाठ करणेही जड वाटत असताना, ‘देव हरवला’ ही त्यांची एकांकिका पूर्ण चमूला तोंडपाठ आहे. सिद्धार्थ महाविद्यालयाच्या केविन डिसुझाला पंढरपूरबाजूची बोली समजून घेण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पैशांची अडचण आल्यावर स्वत:च्या पॉकेटमनीमधील पैसे विद्यार्थ्यांनी गोळा केले. एकांकिकेच्या खर्चासाठी पै पै साठवून पिगी बँक तयार करताना पैसे वाचवण्याचे महत्त्व आपसूकच शिकल्याचे विद्यार्थी सांगतात. शिवाय येणाऱ्या परिस्थितीतला तोंड देत कोणत्याही परिस्थितीत ठरवलेले पूर्ण करण्याची जिद्द नाटकाने विद्यार्थ्यांना दिली. एकांकिकेत वासुदेवाची भूमिका साकारताना गाणी आणि अभिनय अशा दोन गोष्टी सांभाळण्याची जबाबदारी गौरी डोंगरे या विद्यार्थिनीने पेलली आहे. या दोन्ही गोष्टींचा सराव आणि रोजचा अभ्यास सांभाळताना वेळेचे व्यवस्थापन गौरी शिकते आहे.

अगदी रोज समोर असणाऱ्या आणि सहज निसटून जाणाऱ्या गोष्टींचे आता बारकाईने निरीक्षण करण्याची सवय लागल्याचे खालसा महाविद्यालयाच्या अमित पाटील याने सांगितले. अमित त्यांच्या ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस फिफ्टी फिफ्टी’ या एकांकिकेत सत्तर वर्षांच्या वृद्धाची भूमिका करत आहे. ‘एखाद्या व्यक्तीच्या वागण्या-बोलण्यामागे काय भूमिका असेल, जाणीव असेल याचा विचार आता सहज मनात येतो, त्याचे कारण नाटक आहे. आपण जे रोज जगतो त्यापेक्षा वेगळे काही समजून घेता येते म्हणून नाटक करायला आवडते. गेल्या वर्षीपासून मी एकांकिका स्पर्धेत सहभागी होत आहे. तेव्हापासून प्रत्येक गोष्टीचे निरीक्षण करण्याची सवय मला आता हळूहळू लागली आहे,’ असे अमितने सांगितले. सातत्याने कानावर पडणाऱ्या आवाजांमागील गंमत समजून घेणे एकांकिकेतील सहभागामुळे शक्य झाले, असे खालसा महाविद्यालयाच्या ओंकार बुगडे याने सांगितले. ‘प्रत्येक आवाजाला त्याचे एक व्यक्तिमत्त्व असते. ते नाटकामुळे समजून घेता आले. आपल्या आवाजाचे महत्त्वही लक्षात आले. याशिवाय संघ म्हणून काम करताना अनेक गोष्टी शिकत आहे. आपण एकटय़ाने एखादी गोष्ट करणे आणि सगळ्यांनी मिळून एखादी गोष्ट करणे यांत फरक आहे. एकमेकांना समजून घेण्याची समज नाटक देते,’ असे ओंकार बुगडे याने सांगितले.

प्रायोजक

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने यंदाची ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंड पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठी झी मराठी टेलीकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.