मुंबई : कोतवाल सेवेत असताना मरण पावल्यास किंवा गंभीर आजार, अपघात यामुळे शासकीय सेवा करण्यास असमर्थ ठरल्यामुळे त्याच्या कुटुंबावर आर्थिक आपत्ती येते. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर कोतवाल पदावर नियुक्ती देण्याबाबत शासनाने ऑक्टोबर २०२४ मध्ये मान्यता दिली होती. त्यानुसार सरळसेवा भरतीमधील दहा टक्के पदे कोतवालांच्या वारसदारांसाठी ठेवण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला.

मयत किंवा नोकरी करण्यास वैद्यकीय दृष्ट्या अपात्र असलेल्या कोतवालाचा पती किंवा पत्नी, मुलगा किंवा मुलगी, मृत्युपूर्वी कायदेशीररित्या दत्तक घेतलेला मुलगा किंवा मुलगी, मुलगा हयात नसेल किंवा तो नियुक्तीसाठी पात्र नसेल तर त्याची सून, घटस्फोटित मुलगी किंवा बहीण, परित्यक्ता मुलगी किंवा बहीण, विधवा मुलगी किंवा बहीण किंवा त्याच्यावर सर्वस्वी अवलंबून असणारा कोतवालाचा भाऊ किंवा बहीण यांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासाठी पात्र केले जाते. मात्र, हे ठरविण्याचा अधिकार मृत कोतवालाची पती किंवा पत्नीला आहे. यापैकी कोणी हयात नसल्यास पात्र कुटुंबीयांनी एकत्रित येऊन कोणाची नियुक्ती करावी याबाबत नामांकन करावे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे.

अनुकंपा नियुक्तीसाठीची माहिती संबंधित कुटुंबीयांना देण्याची जबाबदारी आस्थापना अधिकाऱ्यावर सोपविण्यात आली आहे. कोतवालाचा वारसदार सज्ञान नसेल तर तो सज्ञान झाल्यानंतर एक वर्षाच्या आत अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी अर्ज करू शकेल. हेदेखील संबंधित कोतवालाच्या कुटुंबाला लेखी कळविण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यावर बंधनकारक राहील.

अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्यापूर्वी संबंधिताकडून दिवंगत कोतवालावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील अन्य व्यक्तींचा सांभाळ करण्याबाबत प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे. भविष्यामध्ये सदर प्रतिज्ञापत्राचे उल्लंघन झाल्याची तक्रार संबंधित कुटुंबातील सदस्यांनी केल्यास चौकशीअंती दोषी आढळल्यास त्याला सेवेतून काढून टाकण्यात येईल.

– अनुकंपा तत्वावर नियुक्तीसाठी कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र.

– कोतवालाची दोन लग्न झाले असल्यास दुसऱ्या पत्नीचे संमतीपत्र आवश्यक.

– अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षासूचीवरील उमेदवाराचे निधन झाल्यास त्याऐवजी कुटुंबातील अन्य पात्र.

– कोतवालाच्या मृत्यूनंतर त्याच्या पात्र कुटुंबीयांचे नाव अनुकंपाधारकांच्या प्रतीक्षासूचीमध्ये घेतल्यानंतर त्याच्याऐवजी अन्य पात्र वारसदाराचे नाव प्रतीक्षासूचीमध्ये घेता येणार नाही.