मुंबई : टाटा कॅन्सर रुग्णालयामागील खारघर – तुर्भे बोगद्याच्या मार्गातील टेकड्यांवरील खाणींमधून परिसरात होणाऱ्या वायू प्रदूषणाबाबत पर्यावरणप्रेमींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली होती. दरम्यान, याप्रकरणी मुख्यमंत्र्यानी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
खारघर – तुर्भे बोगद्याच्या मार्गातील टेकड्यांवरील खाणींमधून परिसरात धुळीचे लोट पसरत असून त्यामुळे प्रदुषणाचा धोका वाढल्याची तक्रार गुरुवारी पर्यावरणासाठी काम करणाऱ्या नॅटकनेक्ट फाउंडेशन आणि खारघर हिल अँड वेटलँड या संस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेल पाठवून केली होती. यापूर्वी टाटा रुग्णालयाच्या संचालकांनी यासंदर्भात सरकारकडे तक्रार केली होती, त्यानंतर काही काळ खाणी बंद झाल्या होत्या. मात्र, काही दिवसांनंतर त्या पुन्हा सुरू करण्यात आल्या. दरम्यान, या खाणींमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे लोट पसरत आहेत. या धुळीचा त्रास प्रामुख्याने टाटा कॅन्सर रुग्णालयातील रुग्ण आणि सेक्टर ३० ते ३५ आणि त्यापलीकडे असलेल्या निवासी वसाहतींमधील रहिवाशांना होत असल्याचे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले. याचबरोबर रुग्णालयातील प्रगत कर्करोग उपचार उपकरणांसाठी धूळ घातक असून, रुग्णांसाठी ही बाब अत्यंत गंभीर असल्याचेही त्यांनी अधोरेखीत केले.
दरम्यान, खाणीसाठी पर्यावरणीय मंजुरी आवश्यक असल्याचे निर्देश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिले आहेत. मात्र तरीही खारघरमधील खाणींना परवानगी कशी दिली जाते, असा सवाल पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे. तसेच खाणीला पूर्वपरवानगी देण्यापूर्वी सखोल पर्यावरणीय परिणामांचे मूल्यांकन करणे अनिवार्य आहे, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे. एकूण पार्श्वभूमी लक्षात घेऊन खारघरमधील खाणी तात्काळ बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.