मुंबई :अनेकांना विविध अडचणींमुळे आणि घरातील जबाबदाऱ्यांमुळे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडावे लागते. मात्र या परिस्थितीत अनेकांना शिक्षणाची आवड खुणावत असते. त्यामुळे आयुष्यातील विविध जबाबदाऱ्या आणि नोकरी सांभाळून शिक्षण घेणाऱ्यांसाठी मुंबई विद्यापीठाअंतर्गतचे दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र (‘सीडीओई’ पूर्वीचे ‘आयडॉल’) गेल्या अनेक वर्षांपासून एक पर्याय म्हणून उपलब्ध आहे. ‘आयडॉल’मधील पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.

दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये एम.ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क), एम. कॉम. (ऍडव्हान्स अकाउंटन्सी), एम. कॉम. (बिझनेस मॅनेजमेंट), एम.एस्सी. (गणित) एम.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), एम.एस्सी. (संगणकशास्त्र), एमएमएस, एमसीए या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युअट डिप्लोमा इन फायनॅन्शिअल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. या शैक्षणिक वर्षापासून एम. ए. समाजशास्त्र हा अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीने सुरु केला जात आहे.

पदवी अभ्यासक्रमांमध्ये बी.ए., बी.कॉम. आणि बी.कॉम. (अकाऊंट अँड फायनान्स), बी.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), बी.एस्सी. (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसंबंधित सर्व तपशील विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु केली जाणार आहे. संस्थेमार्फत चालविण्यात येणारे अभ्यासक्रम हे विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी), अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांच्याकडून मान्यताप्राप्त आहेत.

प्रवेशासंबंधित मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण

ज्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण प्रणाली हा एक पर्याय म्हणून विद्यार्थ्यांना उपलब्ध होतो. ‘आयडॉल’ची चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्र असून या ठिकाणी प्रवेशासंबंधित मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण केले जाते. तर पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरु करण्यात येणार आहे.

‘एमएमएस’. ‘एमसीए’ अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षाही लवकरच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सीडीओईमार्फत चालविण्यात येणाऱ्या ‘एमएमएस’ आणि ‘एमसीए’ अभ्यासक्रमांचे प्रवेश हे प्रवेश परीक्षेद्वारे केले जात असून लवकरच या दोन्ही अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षाआयोजित केली जाणार आहे.