मुंबई : ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द ताशकंद फाइल्स’ या चित्रपटानंतर देशातील एका महत्त्वपूर्ण घटनेवर आधारित विवेक अग्निहोत्री ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी आता ‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटात ‘माँ भारती’ या १०० वर्षांच्या महिलेची ऐतिहासिक भूमिका साकारत आहेत. ‘माँ भारती’ या भूमिकेतील पल्लवी जोशी यांचा लूक लक्षवेधी ठरत आहे.
‘द बंगाल फाइल्स’ चित्रपटात मी साकारलेली भूमिका आजवरच्या माझ्या प्रवासातील सर्वात कठीण भूमिकांपैकी एक आहे. वयस्कर दिसणे हे सोपे नाही. प्रोस्थेटिक मेकअपमुळे मी बऱ्याच वेळा भयावह दिसत होते. परंतु आम्हाला प्रेमळ आणि निरागस वाटणारा चेहरा हवा होता. ‘माँ भारती’ या पात्रात मायेची ऊब आणि आपुलकी दिसायला हवी होती. मी आजीला खूप वृद्ध असताना पाहिले आहे, ती स्वभावाने प्रचंड प्रेमळ होती. त्यामुळे ‘माँ भारती’ ही भूमिका साकारताना एक संदर्भ म्हणून माझ्या आजीचा चेहरा डोळ्यांसमोर ठेवला होता’, असे पल्लवी जोशी यांनी सांगितले.
‘द बंगाल फाइल्स’ या चित्रपटाची कथा विवेक रंजन अग्निहोत्री यांनी लिहिली असून अभिषेक अग्रवाल आणि पल्लवी जोशी यांनी संयुक्तपणे सदर चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, अनुपम खेर आणि दर्शन कुमार या प्रसिद्ध कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तेज नारायण अग्रवाल आणि ‘आय एम बुद्धा’ प्रस्तुत हा चित्रपट विवेक अग्निहोत्री यांच्या ‘फाइल्स ट्रिलॉजी’चा तिसरा भाग आहे.
यापूर्वी या मालिकेतील ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द ताशकंद फाइल्स’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. आता ‘द बंगाल फाइल्स’ हा हिंदी चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत असून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, यापूर्वी हा चित्रपट ‘द दिल्ली फाइल्स’ या नावाने ओळखला जात होता. परंतु आता या चित्रपटाचे नाव बदलून ‘द बंगाल फाइल्स’ ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाचा अधिकृत टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
‘माँ भारती’ या पात्रामध्ये अनेक भावनिक स्तरही आहेत. आम्ही या पात्राच्या लूकवर सुमारे ६ महिने काम केले. त्या काळात माझी त्वचा कोरडी आणि वृद्ध वाटण्यासाठी मी ‘स्किन केअर’ पूर्णपणे बंद केले होते. तसेच ‘माँ भारती’ या पात्राची डिमेन्शिया अवस्था हुबेहूब दाखविण्यासाठी विशेष काम केले. तसेच आमच्या तांत्रिक टीमनेही हा लूक आणि पात्र अधिकाधिक वास्तवदर्शी वाटण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली असून ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना ते आपसूकच जाणवेल’, असेही पल्लवी जोशी यांनी सांगितले.