पुढील आठवडय़ात केंद्रांवर पुन्हा गर्दी होण्याची शक्यता

मुंबई : कोव्हिशिल्डच्या दुसऱ्या मात्रेच्या प्रतीक्षेत असलेल्या बहुतांश जणांचे ८४ दिवस २४ मेला संपत असल्याने पुढील आठवडय़ात पुन्हा लसीकरण केंद्रांवर गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान कोव्हिशिल्डची दुसरी मात्रा घेण्याकरिता वेळ आरक्षित न करता थेट लस घेण्याची सुविधा उपलब्ध असेल.

मुंबईत केवळ ज्येष्ठ नागरिकांचे थेट लसीकरण सुरू असल्याने केंद्रावर मंगळवारपासून विशेष गर्दी झालेली दिसत नाही. अनेक केंद्रांवर तर दिलेल्या १०० मात्राही संपत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे वेळ वाया जाऊ नये यासाठी ४५ वर्षांवरील नागरिकांना पूर्वनोंदणीशिवाय पहिली मात्रा देण्याची मागणी केली जात आहे. ‘पुढील चारच दिवसांत कोव्हिशिल्डची पहिली मात्रा घेतलेल्या ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांना ८४ दिवस पूर्ण होत येणार आहेत. त्यामुळे आता लसीकरण केंद्रावर त्यांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने सध्या तरी ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी पूर्वनोंदणी न करता लसीकरण सुरू केलेले नाही. दुसरी मात्रा घेण्यासाठी पात्र असलेल्यांना प्राधान्याने लस देणे गरजेचे आहे’, असे पालिकेचे अतिरिक्त आयमुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. शहरात मंगळवारी सुमारे २१ हजार कोव्हिशिल्ड आणि नऊ हजार कोव्हॅक्सिनचा साठा पालिके ला मिळालेला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांकरिता सध्या पालिके कडे साठा उपलब्ध आहे.

मुंबईतील लसीकरणाची स्थिती

२८,८७,७१० जणांचे मुंबईत आतापर्यंत लसीकरण पूर्ण झाले आहेत. यात २,९९,१६२ आरोग्य कर्मचारी, ३,५६,८११ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शहरात बुधवापर्यंत ११,५५,४०३ ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील १०,११,४७५ आणि १८ ते ४४ वयोगटातील ६४,८५९ नागरिकांनी लस घेतली आहे.

पालिका रुग्णालय

१९,५२,७२९  जणांचे पालिकेच्या लसीकरण केंद्रावर आतापर्यंत लसीकरण झाले आहे. यात सर्वाधिक ७,४२,६२७ लसीकरण ज्येष्ठ नागरिकांचे झाले आहे. सर्वात कमी (३५,५४८) १८ ते ४४ वयोगटातील झाले आहे. या केंद्रांवर २,३५,१६९ आरोग्य कर्मचारी, २,९७,९७१ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे.

राज्य सरकारी केंद्रे

२,६३,६२८ जणांनी मुंबईत राज्य सरकारच्या लसीकरण केंद्रावर लस घेतली असून यात

सर्वाधिक लस ४५ वर्षांवरील १,१६,३२२ नागरिकांना दिली आहे.

कोविशिल्ड

२६,९२,२१६ जणांना मुंबईत आतापर्यंत कोविशिल्ड दिली असून यात २०, ३४,२९७ जणांनी पहिली मात्रा तर ६,५७,९१९ जणांनी दुसरी मात्रा घेतली आहे.

कोव्हॅक्सिन

१,९५,४९४ जणांनी मुंबईत आतापर्यंत कोव्हॅक्सिन घेतली असून यात १,२७,८०५ जणांची पहिली मात्रा तर ६७,६८९ जणांनी दुसरी मात्रा पूर्ण केली आहे.

खासगी केंद्रे

६,७१,३५३ जणांनी मुंबईतील खासगी लसीकरण केंद्रांवर  आतापर्यंत लस घेतली आहे.यात ६० वर्षांवरील ३,३७,१२२ नागरिकांनी लस घेतली असल्याची माहिती देण्यात आली. या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस? बँकेतील कर्मचारी, सीमाशुल्क विभाग, प्राप्तीकर विभाग इत्यादी विभागातील कर्मचाऱ्यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांचे लसीकरण करण्याच्या सूचना केंद्राने दिल्या आहेत. परंतु सध्या उपलब्ध लशींचा साठा आणि दुसरी मात्रा घेण्यासाठी पात्र व्यक्तींची संख्या यामुळे त्यांना लस देण्याबाबत पालिका विचार करत आहे, असे काकाणी यांनी सांगितले.