मुंबई : राज्यात पावसाचा जोर कायम असून, विदर्भ आणि मराठवाडय़ातील काही जिल्ह्यांत पूरस्थिती आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातही सर्वदूर मुसळधार पाऊस पडत असून तेथे आणखी दोन दिवस मुसळधारांची शक्यता आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे, पालघर भागात बुधवारीही अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पूरस्थितीला सामोरे जाणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांत सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. अकोला जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. घरांची पडझड झाली असून पिकांचेही नुकसान झाले आहे. मागील दोन दिवसांत जिल्ह्यातील ५२ पैकी १० मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, संगमेश्वर व राजापूर शहराला पावसाने झोडपले आहे.
काही भागात पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला आहे. तेथील नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून अनेक शहरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे रोहा, नागोठणे, आणि आपटा परिसराला सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
पावसाची विश्रांती कधी?
साधारण शुक्रवारपासून मुंबईसह ठाणे, पालघर भागात बुधवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा तर, रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उर्वरित भागातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. साधारण पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून शुक्रवारपासून राज्यात पावसाचा जोर कमी होईल.
मंगळवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत झालेला पाऊस
पुणे – ४१ .४ मिमी
लोहगाव – ४५ मिमी
महाबळेश्वर – १४४ मिमी
सातारा – २३ मिमी
डहाणू – १३१ मिमी
सांताक्रूझ – १६३ मिमी
रत्नागिरी – ३७ मिमी
कुलाबा – ६३ मिमी
पावसाचा इशारा कुठे
अतिमुसळधार पाऊस
मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक घाट परिसर
अतिवृष्टी
रायगड , पुणे घाट परिसर , कोल्हापूर घाट परिसर
मेघगर्जनेसह पाऊस
सिंधुदुर्ग, धुळे , अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ