मुंबई महानगरपालिकेने आरोग्य सेविकांना घरोघरी वाटप करण्यासाठी दिलेल्या जंतनाशक गोळ्या निकृष्ट दर्जाच्या किंवा जुन्या असल्याची भीती आरोग्य सेविकांनी व्यक्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गोळ्यांमुळे काही मुलांना उलट्या झाल्याचेही आरोग्य सेविकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आरोग्य सेविकांनी या गोळ्यांच्या वाटपाचे काम बंद केले आहे. असे असताना आता या जंतनाशक गोळ्यांच्या दर्जाबाबत मुंबई महापालिकेकडून खुलासा जाहीर करण्यात आला आहे.
राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहीम अंतर्गत १ वर्ष ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक औषधी गोळ्यांचे वितरण करण्यात येत आहे. या औषधी गोळ्या उत्कृष्ट दर्जाच्या असून त्याबद्दल नागरिकांनी विश्वास बाळगावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
तसेच “काही समाजमाध्यमांवर अफवा पसरविण्यात आली आहे की, या औषधी गोळ्यांचा दर्जा योग्य नसल्याने त्याचे वितरण थांबवण्यात आले आहे. सदर आरोप चुकीचे असून या अफवेवर नागरिकांनी विश्वासू ठेवू नये, तसेच तशी माहिती / ध्वनिफित अग्रेषित करु नये, असे आवाहन करण्यात येत आहे. या अभियान अंतर्गत दिनांक १० ऑक्टोबर २०२२ ते १३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ६५ हजार ९६३ इतक्या लाभार्थीना गोळ्यांचे वाटप करण्यात आलेले आहे व कोणताही दुष्परिणाम आढळून आलेला नाही.” असेही महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे.
१० ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर कालावधीत विशेष मोहीम –
राष्ट्रीय जंतनाशक कार्यक्रम अंतर्गत, राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेच्या निमित्ताने १० ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२२ या आठवड्याच्या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या कालावधीत अंगणवाडी, शाळा, महाविद्यालय व शाळा बाह्य मुला-मुलींना जंतनाशक औषधाची गोळी (Albendazole) चे वाटप करण्यात येत आहे. या मोहिमेत १ वर्ष ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींचा समावेश करण्यात आला आहे. या वयोगटातील मुला-मुलींना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे ही या मोहीमेची उद्दिष्टे आहेत.
६५ हजार ९६३ लाभार्थीना झाले गोळ्यांचे वाटप –
याशिवाय, जंतनाशक मोहिमेदरम्यान वय १ ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना आरोग्य केंद्र अंतर्गत स्थानिक पातळीवर सहाय्यक परिचारिका प्रसविका, समन्वयक, आशा, आरोग्य स्वयंसेविका यांच्या मार्फत जंतनाशक गोळ्या देण्यात येत आहे. शालेय आरोग्य विभागाच्या वतीने महानगरपालिका शाळेतील मुला-मुलींची तपासणी, उपचार, समुपदेशन व मार्गदर्शन देखील या कालावधीत करण्यात येत आहे. या अभियान अंतर्गत दिनांक १० ऑक्टोबर २०२२ ते १३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ६५ हजार ९६३ इतक्या लाभार्थीना या गोळ्यांचे वाटप करण्यात आलेले आहे व कोणताही दुष्परिणाम आढळून आलेला नाह, असे पालिकेने म्हटले आहे.
ध्वनिफित अत्यंत चुकीची आहे –
आज (दिनांक १४ ऑक्टोबर २०२२) काही समाज माध्यमांमार्फत ध्वनिफित प्रसारित करुन आरोप करण्यात आले आहेत की, या अभियान अंतर्गत निकृष्ट दर्जाच्या गोळ्यांचे वाटप होत आहे, तसेच आशा व आरोग्य सेविकांना गोळ्या वाटप न करण्याबाबत सांगितले आहे. सदर ध्वनिफित ही अत्यंत चुकीची असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. तसेच अशा प्रकारचे आरोप करणारे कोणतीही माहिती किंवा ध्वनिफित अग्रेषित करु नये, असेही विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
…तर जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा –
बालकांना कोणतेही लक्षणे आढळले तर त्यांच्या पालकांनी जवळच्या आरोग्य केंद्राशी अथवा डॉक्टरांशी संपर्क साधायचा आहे. नागरिकांनी जंतनाशक मोहीम अंतर्गत सहभाग घेऊन बालकांचे, मुला-मुलींचे आरोग्य सदृढ ठेवायचे आहे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.