नवी मुंबईकर आणि कल्याणकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नव्या वर्षात, २०२३ मध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) कल्याण ते तळोजा मेट्रो १२ मार्गिकेसह ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ च्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने एमएमआरडीएकडून तयारी सुरू आहे.

हेही वाचा >>>‘Scam 2003 The Telgi Story’  वेबमालिकेविरोधात तेलगीच्या मुलीची न्यायालयात धाव

मुंबई आणि एमएमआरमधील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी एमएमआरडीएकडून ३३७ किमी मेट्रोचे जाळे विणले जात आहे. यातील मेट्रो १ (वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर) ही एकमेव मेट्रो मार्गिका पूर्णतः कार्यान्वित आहे. तर मेट्रो २ अ (दहिसर ते डीएन नगर)आणि मेट्रो ७( दहिसर ते अंधेरी) मार्गिकेतील दहिसर-डहाणूकरवाडी-आरे असा २० किमीचा एक टप्पा एप्रिल २०२२ मध्ये सेवेत दाखल झाला आहे. तर मेट्रो २ ब, ३, ४,४ अ, मेट्रो ५(टप्पा १), मेट्रो ६,, मेट्रो ९ चे काम सध्या वेगात सुरू आहे. यातील मेट्रो २ अ आणि ७ चा दुसरा टप्पा महिन्याभरात सेवेत दाखल होणार आहे. असे असताना नव्या वर्षात एमएमआरडीएने आणखी दोन मार्गिकेच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहितीएमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. कल्याण ते तळोजा मेट्रो १२ आणि मेट्रो ५ मधील भिवंडी ते कल्याण अशा दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात होईल असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>मुंबई: मारहाणीत ५३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कल्याण ते तळोजा मार्गिका २०.७५ किमी लांबीची असून या मार्गिकेत १८ मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. कल्याण एपीएमसी, गणेश नगर (कल्याण), पिसावली गाव, गोलावली, डोंबिवली एमआयडीसी, सागांव, सोनारपाडा, मानपाडा (डोंबिवली पूर्व), हेदुतने, कोलेगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाक्लन, तुर्भे, पिसार्वे आगार, पिसार्वे आणि तळोजा अशी ही मेट्रो स्थानके आहेत. या मार्गिकेच्या कामासाठी ४१३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून आता नव्या वर्षात या मार्गिकेच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. मेट्रो ५ मधील भिवंडी ते कल्याण या दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी सांगितले. मेट्रो ५ च्या कामालाही सुरुवात होणार असल्याने ही बाब ठाणेकर आणि कल्याणवासियांना दिलासा देणारी ठरणार आहे.