कोणतीही घटना घडली की, त्याची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचा पायंडा मध्य रेल्वेने बुधवारच्या गोंधळानंतरही कायम राखला. बुधवारी तांत्रिक बिघाडामुळे झालेल्या गोंधळामुळे लाखो प्रवाशांचे हाल झाले होते. विद्युत यंत्रणेतील ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्यामुळे हा तांत्रिक बिघाड झाला. मात्र २५ वर्षे आयुर्मान असलेला हा भाग दोनच वर्षांत कसा निकामी झाला, याची जबाबदारी कोणाची, त्यावर काय कारवाई करायची, आदी गोष्टींच्या तपासासाठी आता रेल्वेने त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. ही समिती पुढील आठवडय़ात आपला अहवाल सादर करणार आहे.
मध्य रेल्वेवर बुधवारी तांत्रिक बिघाडामुळे लोकलसेवा तब्बल अडीच-तीन तास बंद होती. त्यामुळे लाखो प्रवाशांचे हाल झाले होते. विद्युत यंत्रणेतील ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर निकामी झाल्यामुळे हा बिघाड झाल्याचे रेल्वेतर्फे सांगण्यात आले. विशेष म्हणजे ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मरचे आयुर्मान २५ वर्षांचे असताना संबंधित ट्रान्सफॉर्मर दोन वर्षांतच कसा काय निकामी झाला, असा प्रश्न आता रेल्वे अधिकाऱ्यांना पडला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी या त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
सिग्नल अ‍ॅण्ड टेलिकॉम विभाग, ओव्हरहेड वायर यंत्रणा विभाग हे बिघाडाशी संबंधित आणि एक स्वतंत्र अधिकारी, असे तीन अधिकारी या समितीत असतील.