मुंबई : मध्य रेल्वेवरील कांजूरमार्ग स्थानकातील जुन्या पादचारी पुलाच्या पाडकामासाठी शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी रात्री लोकल सेवेवर परिणाम होईल. तसेच रात्रीच्या वेळी विद्याविहार, कांजूरमार्ग व नाहुर या स्थानकांवर लोकल सेवा उपलब्ध होणार नाही.

मध्य रेल्वेवर शनिवारी रात्री १२ ते पहाटे ५ दरम्यान अप व डाऊन धिम्या, जलद; तसेच पाचव्या आणि सहाव्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत कांजूरमार्ग स्थानकावर कल्याण दिशेकडील जुन्या पादचारी पुलावरील तुळया हटवण्यात येणार आहेत. या कामासाठी १०० मेट्रिक टन क्षमतेच्या रोड क्रेनचा वापर करण्यात येणार आहे.

ब्लॉकमुळे या लोकल रद्द होणार

  • रात्री ११.४० ची ठाणे – कुर्ला लोकल
  • पहाटे ४.०४ ची ठाणे – सीएसएमटी लोकल
  • रात्री ११.३८ ची सीएसएमटी – ठाणे लोकल
  • रात्री १२.२४ ची सीएसएमटी – ठाणे लोकल

ब्लॉकमुळे या लोकल अंशतः रद्द

  • रात्री ११, ११.१२, ११.४६ आणि ११.५५ वाजता सुटणाऱ्या सीएसएमटी – ठाणे लोकल कुर्ल्यापर्यंत चालवण्यात येतील.
  • रात्री १०.१८ ची डोंबिवली – सीएसएमटी लोकल ठाण्यापर्यंत चालवण्यात येईल.

अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्याविहार, कांजूरमार्ग व नाहुर स्थानकांवर लोकल थांबा नसेल.