सुशांत मोरे

रूळ ओलांडताना दीड वर्षांत अडीच हजार जणांचा मृत्यू; अडीच वर्षांत ६२ हजार प्रवाशांना दंड

दोन रुळांच्या मधोमध उभारण्यात आलेले लोखंडी अडथळे, कुंपणाची तटबंदी, रूळ न ओलांडण्याबाबत दिलेल्या सूचना यांकडे काणाडोळा करत दररोज हजारो प्रवासी रूळ ओलांडण्याचा धोका पत्करतच आहेत. प्रवासातील काही मिनिटे वाचवण्याच्या प्रयत्नात रूळ ओलांडताना गेल्या दीड वर्षांत अडीच हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, गेल्या अडीच वर्षांत तब्बल ६२ हजार प्रवाशाकडून रूळ ओलांडल्याबद्दल दोन कोटींचा दंड ठोठावण्यात आला. मात्र, तरीही रूळ ओलांडण्याची ‘जीवघेणी’ सवय प्रवाशांमध्ये कायम आहे.

रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांवर ओरड सुरू झाल्यानंतर मुंबईतील रेल्वे प्रशासनाने अनेक स्थानकांत पादचारी पूल उभारले. काही स्थानके अजूनही पादचारी पुलांच्या प्रतीक्षेत असली तरी, ज्या स्थानकात पुलांची उभारणी करण्यात आली आहे, त्या स्थानकांतील प्रवासीदेखील जिन्यांना बगल देऊन रुळांवरून मार्गक्रमण करतात. मात्र, रेल्वेगाडय़ांची धडक बसून यातील शेकडो प्रवासी दरवर्षी मृत्युमुखी पडतात.

रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांविरोधात  सुरक्षा दलाकडून कारवाईही केली जाते. २०१६ ते २०१८ (ऑगस्टपर्यंत) दरम्यान रूळ ओलांडणाऱ्यांविरोधात रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत ६२ हजार २४८ प्रवासी जाळ्यात अडकले. रेल्वे न्यायालयाने दिलेल्या शिक्षेमुळे ६१३ जणांना तर तुरुंगाची हवा खावी लागली आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बरवरील सर्वाधिक ५३८  प्रवाशांचा समावेश आहे. या प्रवाशांकडून रेल्वेने आतापर्यंत १ कोटी ९१ लाख रुपये दंड वसूल केल्याची माहिती मध्य व पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.

रूळ ओलांडण्याचे जास्त प्रमाण कुठे?

* मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील सॅन्डहर्स्ट रोड, दादर, सायन, कुर्ला, विक्रोळी, कांजुरमार्ग, मुलुंड, ठाणे, कळवा ,मुंब्रा ते दिवा, डोंबिवली ते कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ.

* हार्बरवर शिवडी, वडाळा, जीटीबी, कुर्ला, टिळकनगर ते वाशी आणि माहीम जंक्शन स्थानकाच्या हद्दीत.

* पश्चिम रेल्वेवर मुंबई सेन्ट्रल, प्रभादेवी, दादर ते जोगेश्वरी, गोरेगाव ते बोरिवली, भाईंदर, विरार, वसई भागात.