मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) सोडतीतील प्रतीक्षा यादी कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रतीक्षा यादीवरील घरांचे वितरण वर्षांनुवर्षे सुरूच असून त्याद्वारे भ्रष्टाचार होत असल्याचे निदर्शनास आल्याचे स्पष्ट करत सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

म्हाडा सोडत प्रकियेअंतर्गत संकेत क्रमांकानुसार आणि उत्पन्न गट, आरक्षित गट याप्रमाणे उपलब्ध घरांच्या संख्येएवढेच विजेते ऑनलाइन पध्दतीने जाहीर केले जातात. त्याचवेळी  प्रतीक्षा यादीवरील विजेतेही घोषित केले जातात. मूळ विजेता अपात्र ठरल्यास प्रतीक्षा यादीवरील पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याला संधी दिली जाते. तो पात्र ठरला तर त्याला घर वितरित केले जाते. मात्र तो अपात्र ठरला तर दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला संधी मिळते.  ही प्रक्रिया अशीच पुढे जाते. त्यामुळे या प्रक्रियेतील प्रतीक्षा यादी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र ही  प्रक्रिया भ्रष्टाचाराचे मोठे कारण ठरत असल्याचे सांगून म्हाडाच्या मुंबई मंडळाने ही यादी बंद करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तो मान्य करण्यात आला आहे. त्यानुसार प्रतीक्षा यादी बंद करण्यात आल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.

अखेर निर्णय.. : म्हाडाची प्रतीक्षा यादी वर्षांनुवर्षे संपत नाही. २०१४ पासूनच्या अनेक प्रकरणांत त्यापूर्वीच्या सोडतीतील घरांचे वितरण सुरूच असल्याचे म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत असल्याचे स्पष्ट करत मुंबई मंडळाने प्रतीक्षा यादी रद्द करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

सर्व विभागीय मंडळांना प्रस्ताव लागू..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्हाडाच्या सोडतीतील प्रतीक्षा यादी बंद करण्याचा निर्णय केवळ मुंबई मंडळासाठी लागू करावा असा प्रस्ताव होता. मात्र आता सर्व विभागीय मंडळांना लागू करण्यात आला आहे. विजेता अपात्र ठरल्यास त्याचे घर पुढच्या सोडतीत समाविष्ट केले जाणार असल्याचे समजते आहे.