मुंबई महानगरपालिकेच्या शिवाजी पार्क येथील जलतरण तलाव परिसरात मंगळवारी सकाळी मगरीचे पिल्लू आढळले. यापूर्वी या जलतरण तलावाच्या परिसरात साप, अजगर आढळले आहेत. त्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप केला आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

संदीप देशपांडे म्हणाले की, “महात्मा गांधी जलतरण तलावामागे एक जागा आहे. तिथे अनधिकृतरित्या प्राण्यांना ठेवलं जातं. तिथं कोणीच कारवाई करायला जात नाही. या अनधिकृत संग्रहालयाची तक्रार तरणतलावाच्या व्यवस्थापकांनी वारंवार केली आहे. कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, ज्यामुळे कारवाई होत नाहीय, हे तपासण्याची गरज आहे.”

हेही वाचा >> मुंबई : शिवाजी पार्कमधील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात आढळले मगरीचे पिल्लू

“आज एक मगर स्विमिंग पूलमध्ये पोहताना दिसली. या अगोदर अजगर, साप आला होता. अनधिकृत प्राणी संग्रहालय बनवलंय, त्यात अजगर, मगर अतिशय दुरवस्थेत ठेवले आहेत. हे मोकाट फिरत असतात. एखाद्याला भिती वाटली आणि मगरीला मारलं तर? माणसांच्या जीवाला धोका आहेच, तसंच प्राण्यांच्याही जीवाला धोका आहे. त्यामुळे प्राणीसंग्रहालयाच्या प्रशासकांनी यावं आणि या प्राण्यांना ताब्यात घेऊन त्यांची निगा राखावी”, अशीही मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.

“या प्राणी संग्रहालयाला परवानगी आहे की नाही हा प्रश्न आहे. परवानगी असेल तर योग्य नियम पाळले गेले आहेत का. प्राण्यांना चांगल्या वातावरणात ठेवणं आवश्यक आहे, त्यांची निगा घेणं आवश्यक आहे”, असंही संदीप देशपांडे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मुंबई महानगरपालिकेचे त्या व्यक्तीसोबत काय लागेबंध आहेत हे माहीत नाही. पण निश्चितच आहेत. कारण, महानगरपालिकेने त्या जागेसंबंधित केस कोर्टात जिंकली आहे. तरीही जागा ताब्यात का घेतली जात नाही. याप्रकरणी आयुक्त इक्बाल सिंग यांची भेट घेऊन ही जागा रिकामी करण्याची मागणी करणार आहे”, असंही ते म्हणाले.