मुंबई : सन मराठी वाहिनीवरील ‘सोहळा सख्यांचा’ या कार्यक्रमाने मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातील महिलांना स्वतःचे कौशल्य दाखविण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजवर बहुसंख्य महिलांनी स्वतःचा प्रवास सांगत अनेकांना प्रेरणा दिली आहे.
सातारा येथे रंगलेल्या कार्यक्रमात सर्वसामान्य महिलांसह काही वीरपत्नीही सहभागी झाल्या होत्या. यावेळी सन मराठी वाहिनीतर्फे वीरपत्नींचा यथोचित सन्मान करण्यात आला. हा भाग सोमवार, १९ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता सन मराठी वाहिनीवर प्रसारित होणार असून प्रेक्षकांना प्रेरणादायी वीरगाथा ऐकायला मिळणार आहे.
आजवर ‘सोहळा सख्यांचा’ या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील महिलांनी सहभागी होत आपल्या आयुष्यातील खास क्षण, संघर्ष, आणि यशाची गोष्ट सांगितली आहे. या प्रेरणादायी कथांमधून महिलांनी अनेकांना जगण्याची एक नवीन उमेद दिली आहे. सातारा येथे रंगलेल्या ‘सोहळा सख्यांचा’ कार्यक्रमात सर्वसामान्य महिलांप्रमाणेच वीरपत्नी निशा लक्ष्मण भोसले यांच्यासह काही वीरपत्नी सहभागी झाल्या आहेत.
या भागात दोन वीरपत्नींचा जीवनप्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या वीरपत्नींनीही आपल्या नवऱ्याच्या पाऊलावर पाऊल ठेवत देशसेवा करण्याचे ठरवले. एका सैनिकाच्या कुटुंबाचे आयुष्य इतके सोप्पे नाही हे खरे आहे पण तरीही संपूर्ण कुटुंबाने भारत मातेच्या संरक्षणासाठी लढण्याची जिद्द ठेवणे ही कौतुकास्पद बाब आहे. दोन्ही मुलांनाही देशासाठी लढायचे आहे, हे ध्येय ठेवून वीरपत्नी निशा लक्ष्मण भोसले यांचे कुटुंब पुढे जात आहे.
दरम्यान, ‘सन मराठी’ वाहिनीकडून विजेत्या वीरपत्नी निशा लक्ष्मण भोसले यांना ‘हुकुमाची राणी’चा बहुमान देऊन त्यांची ओटी भरण्यात आली. या वीरपत्नीने नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. आजवरच्या प्रवासात वीरपत्नींनी विविध अडचणींवर कशाप्रकारे मात केली हे सन मराठी वाहिनीवर सोमवार, १९ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रसारित होणाऱ्या ‘सोहळा सख्यांचा’ या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.