मुंबई : राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या ठाणेस्थित येऊरच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात बांधण्यात आलेली बहुतेक टर्फ मैदाने पाडण्यात आल्याचा अथवा बंद केल्याचा दावा ठाणे महानगरपालिकेने गुरुवारी उच्च न्यायालयात करण्यात आला. तसेच आणखी काही टर्फची मैदाने आढळल्यास त्यावरही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली.
येऊरच्या जंगलात उभारण्यात आलेली नऊपैकी सात टर्फ मैदाने पाडण्यात आली असून उवरित दोन बंद केली आहेत. तसेच, त्यांची अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आल्याची माहितीही ठाणे महापालिकेच्या वतीने वकील मंदार लिमये यांनी न्यायालयाला दिली. त्यावर आणखी दोन टर्फची मैदाने आढळून आल्याची माहिती याचिकाकर्ते रोहित जोशी यांच्या वतीने वरिष्ठ वकील गायत्री सिंह मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाला दिली. त्याची दखल घेऊन अद्याप सुरू असलेल्या उर्वरित टर्फ मैदानांवरील कारवाईबाबत काय, अशी विचारणा न्यायालयाने केल्यानंतर संबंधितांना नोटीस बजावण्यात आल्याचे आणि त्यांनी आठवड्याभरात टर्फ मैदाने बंद न केल्यास किंवा बेकायदा बांधकामे न पाडल्यास आम्ही कारवाई करू, असे आश्वासन ठाणे महापालिकेच्या वतीने न्यायालयाला देण्यात आले.
त्यावर, ठाणे महापालिकेने एका आठवड्याच्या आत उवरित टर्फची मैदाने जमीनदोस्त करावीत, याचिकाकर्त्यांना आढळून आलेल्या आणखी दोन टर्फच्या मैदानांवरही महापालिकेने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, ती करण्यापूर्वी संबंधितांना सुनावणी द्यावी, असे आदेश देऊन न्यायालयाने याचिका निकाली काढली. दरम्यान, येऊरच्या जंगलातील टर्फ मैदाने अद्यापही सुरू असल्याची छायाचित्रे याचिकाकर्ते रोहित जोशी यांच्या वतीने मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयात सादर करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर, ठाणे महापालिकेने गुरूवारी प्रतिज्ञापत्र दाखल करून उपरोक्त माहिती दिली.
प्रकरण काय ?
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान १०३.८४ चौ. किलोमीटरमध्ये पसरले आहे. याच उद्यानाचा भाग असलेला ठाण्यातील येऊर परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून पर्यावरण, वन व हवा बदल मंत्रालयाने घोषित केले आहे. शून्य ते तीन किलोमीटर परिसरात कोणतेही हॉटेल, रिसॉर्ट उभारण्यास मनाई असूनही येऊरमध्ये ५० विविध अनधिकृत बांधकामे, पाच टर्फ मैदाने (पीच टर्फ क्लब, गुलुकुल क्रिकेट ॲकॅडमी, रंगोळी क्रिकेट फुटबॉल टर्फ १ व २ आणि विकिंग्स टर्फ), हॉटेल, बार, रिसॉर्ट उभी केली आहेत. टर्फ मैदानांवर मोठे दिवे लावून रात्रंदिवस खेळण्यासाठी तासानुसार पैसे मोजावे लागतात. मात्र, मोठे दिवे आणि गोंगाटामुळे वन्यजीव विचलित होत असल्याचा दावा याचिकेत केला होता.