महेश बोकडे

विदर्भात  करोनाबाधितांचा सर्वाधिक मृत्यूदर अकोला, अमरावती जिल्ह्य़ात आहे. तो कमी करण्याची जबाबदारी आता नागपूरच्या मेडिकल रुग्णालयाला सोपवण्यात आली आहे. त्यानुसार येथील तज्ज्ञांचे दोन पथक अकोला, अमरावतीत  दाखल झाले. प्रकृती खाल्यावरच रुग्ण दाखल होत असल्याने दगावणाऱ्यांची संख्या वाढल्याचा प्राथमिक अंदाज या चमूकडून व्यक्त केला जात आहे.

विदर्भातील नागपूर जिल्ह्य़ात (६०५) आणि अकोल्यात (५५९) आढळले  बाधित आहेत. यापैकी अकोलात ३२ तर नागपुरात ११ मृत्यू नोंदवले गेले. नागपुरात आजपर्यंत ६८ टक्के (३८०) रुग्ण करोनामुक्त झाले असून मृत्यूदरही कमी आहे. अकोलात ७३.३५ टक्के (४३२) व्यक्ती करोनामुक्त असले तरी मृत्यूदर ५.२ टक्के आहे.

अमरावतीत २२६ बाधित आजपर्यंत आढळले असून १५ जणांचा मृत्यू (मृत्यूदर ६.६३ टक्के) झाला आहे. नागपुरात मृत्यूदर कमी व करोनामुक्तीचे प्रमाण चांगले असल्याने येथील उपचार यंत्रणेची सर्वत्र प्रशंसा होत आहे. त्यामुळे मेडिकलच्या डॉक्टरांवर शासनाने ही जबाबदारी सोपवली आहे.

यानुसार भूलरोग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. नरेश तिरपुडे, औषधशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. राजेश गोसावी, प्रा. डॉ. मोहम्मद फैजल, सहयोगी प्राध्यापक डॉ. माधुरी होले, सहयोगी प्राध्यापक डॉ. अतुल राजकोंडावार या तज्ज्ञांच्या दोन चमू विभागून  दोन्ही जिल्ह्य़ांत दाखल झाला. डॉ. गोसावी आणि डॉ. होले यांनी  अमरावतीतील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या डॉक्टरांना बाधितांचे सूक्ष्म निरीक्षण करण्यासह उपचारासाठीचे व्यवस्थापन कसे सुधारता येईल, याबाबत आवश्यक सूचना केल्या.

येथील निरीक्षणात त्यांना अमरावतीत एकूण मृत्यूंपैकी निम्मे म्हणजे ८ रुग्ण घरातच दगावल्याचे निदर्शनात आले.  दोघांचा रुग्णालयात काही तासांतच मृत्यू झाला. अकोल्यातही दगावलेल्या सुमारे ३५ टक्ये रुग्णांचे निरीक्षण असेच होते. त्यामुळे येथे  रुग्णांना विलंबाने  आणत असल्याने मृत्यूदर जास्त असल्याचा प्रकार पुढे येत आहे.

विदर्भातील स्थिती

जिल्हा           मृत्यू

नागपूर            ११

अमरावती       १५

अकोला          ३२

वाशीम           ०२

बुलढाणा        ०३

भंडारा            ००

गोंदिया          ००

वर्धा              ०१

यवतमाळ       ०१

गडचिरोली      ००

चंद्रपूर           ००

एकूण           ६५

१ जून २०२० दुपारी ४ वाजेपर्यंत

‘‘अकोला, अमरावती जिल्ह्य़ांतील रुग्णालयांची पाहणी करून सुधारणा सुचवली जाईल. सोबत गरजेनुसार डॉक्टरांनाही उपचारात सुधारणा सुचवली जाईल. तिथे मृत्यूदर जास्त असला तरी त्यात घरात दगावलेले बाधित जास्त आहेत. वेळीच उपचारासाठी रुग्णालयात आल्यास या आजाराचे रुग्ण पूर्णपणे बरे होतात.’’

– प्रा. डॉ. राजेश गोसावी, औषधशास्त्र विभाग (विभागप्रमुख), मेडिकल.