देवेश गोंडाणे

राज्यातील विविध वरिष्ठ महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील ३० हजारांवर प्राध्यापकांची यंदाची दिवाळी अंधारात होणार आहे. करोना संक्रमणामुळे राज्यातील वरिष्ठ महाविद्यालये १६ मार्चपासून बंद आहेत. त्यामुळे तासिका प्राध्यापकांच्या हाताला काम नाही. मार्च व एप्रिल महिन्याचे मानधनही त्यांना मिळालेले नाही. टाळेबंदीच्या काळात समाजातील विविध घटकांना विविध सवलती, आर्थिक मदत केंद्र आणि राज्य शासनाने केली आहे. मात्र, तासिका प्राध्यापकांना कुठलीही मदत मिळालेली नाही. त्यामुळे या प्राध्यापकांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली आहे.

नेट, सेट, पीएच.डी. सारखी पात्रता असूनही अनेक वर्षांपासून शासनाच्या नाकर्तेपणामूळे प्राध्यापक पदभरती बंद आहे. त्यामुळे हे पात्रताधारक आर्थिकदृष्टय़ा हलाखीत जगत आहेत. सात महिन्यांपासून तासिका प्राध्यापकांना मानधन नसल्याने बाहेर गावी कामासाठी राहणाऱ्या या प्राध्यापकांचे घरभाडे अनेक महिन्यांपासून थकले आहे. तर अनेक विवाहित प्राध्यापक प्रापंचिक जबाबदाऱ्याही पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत. तसेच दरवर्षी जुलैमध्ये होणाऱ्या तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्त्या  यावर्षी नोव्हेंबर महिना आला तरी झालेल्या नाहीत. त्यामुळे जुलै ते नोव्हेंबर या काळातील मानधनही यावर्षी मिळणार नाही.

मागील महिन्यात तासिका तत्त्वावरील प्राध्यापक नियुक्तीला मान्यता देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्यापही नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत. तर अनेक महाविद्यालयात ऑनलाईन वर्ग सुरू आहेत. या महाविद्यालयात ऑनलाईन वर्ग हे तासिका प्राध्यापकांना घेण्यास सांगण्यात आले आहेत. परंतु शिक्षक मान्यता नसल्यामुळे या प्राध्यापकांना या कामाचे मानधनही मिळणर नाही. त्यामुळे या प्राध्यापकांची दिवाळी यावर्षी अंधारात जाणार हे आता निश्चित झाले आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची केली आहे.

हजारो प्राध्यापकांची मोफत सेवा

ऑगस्टपासून अनेक महाविद्यालयांनी ऑनलाईन वर्ग सुरू केले. यासाठी महाविद्यालयांमध्ये नियमित प्राध्यापक नसल्याने याचा भार हा तासिका प्राध्यापकांवरच आहे. शासनाने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची अद्यापही नियुक्ती केली नाही. मात्र, भविष्यात तरी आपल्याला संधी मिळेल या अपेक्षेने राज्यभरातील हजारो नेट, सेट, पीएच.डी. सारखी पात्रताधारक मोफत सेवा देत आहेत.

शासनाने सहाय्यक प्राध्यापक भरतीची प्रक्रिया अद्यापही सुरू केली नाही. त्यामुळे महाविद्यालय आणि विद्यापीठात अनेक पदे रिक्त आहेत. पर्यायी तासिका प्राध्यापकांना ऑनलाईन वर्ग घ्यावे लागत आहेत. असे असतानाही सरकार नियुक्ती करत नाही. हा आमच्यावरील अन्याय असून शासनाने तासिका प्राध्यापकांना आर्थिक मदत तरी द्यावी.

– डॉ. रवी महाजन, सचिव, महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना