अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपये प्रतिहेक्टर भरपाई देण्याचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २१ दिवस झाले तरी पाळला नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. अंतिम आठवडा प्रस्तावावर ते विधानसभेत बोलत होते.

उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५ हजार रुपये प्रतिहेक्टर मदतीची घोषणा केली. मात्र, २१ दिवसांनंतरही काहीच केले नाही. राष्ट्रपती राजवट लागू असताना राज्यपालांनी जाहीर केलेल्या मदतीपेक्षा एक पैसाही जास्त त्यांनी दिला नाही. त्यांना पुरवण्या मागण्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी तरतूद करण्याची संधी होती; परंतु तशी तरतूद केली नाही. आम्ही त्यांना त्यासाठी वेळ द्यायला तयार आहोत. परंतु नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीची मदत तर द्यायला हवी होती. ‘सरकार बनवले शरद पवार यांच्या मदतीने, सरकार चालवू सोनिया गांधी यांच्या मदतीने, कर्जमाफी करू नरेंद्र मोदी यांच्या मदतीने’ असे या सरकारचे धोरण दिसते; पण सरकारने आपली जबाबदारी झटकून चालणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

विदर्भाच्या मुद्दय़ावर फडणवीस यांनी आपल्या सरकारने काय केले, याची माहिती दिली. ते म्हणाले, गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होऊन ४० वर्षे झाली. आमचे सरकार आले तेव्हा आम्ही १०० किलोमीटपर्यंत पाणी दिले. विदर्भातील सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य दिले. निधी उपलब्ध करून देताना पारदर्शकता राहावी म्हणून सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे मंत्र्यांचे अधिकार काढण्यात आले आणि त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली.

विदर्भात उद्योगधंदे यावे म्हणून विजेचा दर कमी केला आणि इतर सवलती दिल्या. त्यामुळे विदर्भात अनेक प्रकल्प सुरू झाले. मिहानमध्ये  २०१४ पर्यंत ३० हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळाले होते.