23 March 2019

News Flash

मुखर्जीच्या उपस्थितीत आज संघ शिक्षा वर्गाचा समारोप

कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत.

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे नागपूर विमानतळावर आगमन झाले. ( लोकसत्ता छायाचित्र) 

रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसरात २५ दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाचा समारोप उद्या, गुरुवारी रेशीमबाग परिसरात होणार आहे.

कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. एरव्ही संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाला सरसंघचालक काय बोलतात, याकडे स्वयंसेवकांचे लक्ष लागलेले असते. यंदा सर्वाचे लक्ष प्रणव मुखर्जी यांच्याकडे  लागले आहे. कार्यक्रमासाठी मुखर्जी यांचे दुपारी  ५ वाजता नागपूरला विमानाने आगमन झाले. संघाचे सहसरकार्यवाह व्ही. भागय्या, अखिल भारतीय सह प्रसार प्रमुख सुनील देशपांडे आणि महानगर संघचालक राजेश लोया यांनी त्यांचे स्वागत केले.  मुखर्जी विमानतळावरून थेट राजभवनकडे रवाना झाले. गुरुवारी ते दुपारी ५ वाजून १० मिनिटांनी राजभवनमधून स्मृती मंदिर परिसरात येतील. तेथे ते आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतींना अभिवादन करतील त्यानंतर कार्यक्रमस्थळी जातील.  प्रारंभी स्वयंसेवकांच्या कवायती आणि घोष पथकाचे सादरीकरण होईल. त्यानंतर कार्यक्रमाला प्रारंभ होईल. प्रारंभी प्रमुख अतिथी म्हणून प्रणव मुखर्जी त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण होईल.  विशेष निमंत्रितांसाठी वेगळी व्यवस्था आहे.  संघ शिक्षा वर्गात देशभरातील ७०० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महानगर संघचालक राजेश लोया यांनी केले आहे.

First Published on June 7, 2018 1:48 am

Web Title: pranab mukherjee rss 2