भाजप समर्थित खासदार संचालित वीज वितरण करणारी खाजगी कंपनी एसएनडीएलविरुद्ध असलेल्या तक्रारींची उशिरा का होईना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दखल घेतली असून एसएनडीएलला सोमवारी चांगलाच दणका देत त्यांच्या १२ फिडरवरील सगळ्याच नवीन मिटरची तिसऱ्या पक्षाकडून तपासणीचे आदेश दिले.

येथील काही भागात वीज वितरणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एसएनडीएलविरुद्ध कमालीचा जनाक्रोश आहे. भाजपचे आमदारही या कंपनीच्या  सेवांमुळे नाराज आहेत. वाढीव देयकांमुळे जनता मेटाकुटीस आली आहे. मात्र, कंपनीचे संचालक भाजप समर्थित खासदार असल्याने व वरिष्ठ पातळीवरून या कंपनीवर कारवाई करण्यास अडचणी येत असल्याने सरकार कारवाई करण्यास मागेपुढे पाहात होती. मात्र, तक्रारींचा रेटा वाढल्याने अखेर उर्जामंत्र्यांना कंपनीवर चाबूक उगारावा लागला. सोमवारी हैदराबाद हाऊसमध्ये झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी कंपनीच्या १२ फीडरवरील सर्व मीटरची तपासणी त्रयस्थ कंपनीच्या माध्यमातून करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.