05 August 2020

News Flash

राष्ट्रसंतांच्या पुतळ्याचे धूळ, पत्रकांनी विद्रूपीकरण

ज्यांच्या प्रेरणेने शहरात कर्करोग निदान केंद्र उभे झाले, त्यांचाच पुतळा आज उपेक्षित ठरतोय.

महापालिकेचे दुर्लक्ष

नागपूर : शहराच्या जडणघडणीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी मोठी भूमिका बजावली, पण त्यांच्याच पुतळ्याचे विद्रूपीकरण नागपूरकर उघडय़ा डोळ्याने पाहात आहे. कायम धुळीने माखलेला आणि जाहिरातींची पत्रके लागलेला राष्ट्रसंतांचा पुतळा गेल्या अनेक वर्षांपासून या विद्रूपीकरणातून मुक्तीची मागणी करत आहे. मात्र, महापालिका प्रशासनालाही त्यांची ही हाक ऐकू गेलेली नाही. ज्यांच्या प्रेरणेने शहरात कर्करोग निदान केंद्र उभे झाले, त्यांचाच पुतळा आज उपेक्षित ठरतोय.

राष्ट्रसंतांना कर्करोगाचे निदान झाल्यानंतर सुमारे दोन आठवडे ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल होते. त्यांच्या आयुष्यातील बराच काळ त्यांनी नागपुरात घालवला होता. एवढेच नाही तर नबाबपुरा कर्नलबागेतील गँगवार त्यांच्या प्रयत्नाने थांबले. लेंडी तलावाचे नामकरण, आखाडा संघटन अशा अनेक कार्यात राष्ट्रसंतांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कर्करोगाशी लढताना तत्कालीन मंत्री व समाजसेवी त्यांना भेटायला गेले. त्यांनी तुकडोजी महाराजांना त्यांची इच्छा विचारली. त्यावेळी विदर्भातल्या गरीब माणसाला उपचारासाठी भटकावे लागू नये म्हणून शहरात कर्करोग निदान केंद्राच्या उभारणीची इच्छा व्यक्त केली.

कामगार नेते व माजी मंत्री हरिभाऊ नाईक यांच्या सहकार्याने दुर्गादास रक्षक यांनी लोकसहभागातून मानेवाडा मार्गावर राष्ट्रसंतांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न केला. हा पुतळा राष्ट्रसंतांच्या चेहरा व शरीरयष्टीशी जुळला नाही अशी खंत त्यावेळी लोकांनी व्यक्त केली. त्यातूनच नवीन पुतळा तयार करण्याचा प्रयत्न झाला. तत्कालीन महापौर व दिवंगत सखाराम चौधरी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला, पण त्यांच्या हयातीत त्यांना यश आले नाही. त्यानंतर श्रीगुरुदेव युवा मंचाने प्रयत्न केले, पण शिल्पकाराला राष्ट्रसंतांचा पुतळाच बनवता आला नाही. तरीही १९९६-९७च्या कालावधीत हा नवीन पुतळा बसवण्यासाठी जुना पुतळा काढण्यात आला. तब्बल सहा-सात महिने चबुतरा रिकामाच राहिला. अखेर जुनाच पुतळा त्याठिकाणी बसवला गेला. दुसऱ्यांदा तयार करण्यात आलेला पुतळा अजूनही पालिकेच्या गोदामात तसाच पडून आहे. मात्र, राष्ट्रसंतांच्या पुतळ्याशी जणू काहीच देणे-घेणे नाही अशी पालिका प्रशासनाची भूमिका आहे.

 

माजी उपमहापौर राजाभाऊ लोखंडे यांनी नवीन पुतळा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले, पण राजकारण आडवे आले. आता जुनाच पुतळा त्याठिकाणी असला तरी पुतळ्याच्या चबुतऱ्यावर जाहिरातीची पत्रके चिपकवण्यात आली आहे. कायम हा पुतळा धुळीने माखलेला असतो. नागपूरकरांना राष्ट्रसंतांच्या विचाराची प्रेरणा मिळेल म्हणून लावलेल्या पुतळ्याशी महापालिका प्रशासनाला देणेघेणे नाही.

– ज्ञानेश्वर रक्षक, प्रवर्तक, श्रीगुरुदेव युवामंच

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2020 2:04 am

Web Title: rashtrasant tukdoji maharaj statue depolarization in nagpur
Next Stories
1 ‘फास्टॅग’नंतर आता गतिरोधकमुक्त राष्ट्रीय महामार्ग
2 वन्य प्राण्यांच्या ‘ट्राफीज्’चा अहवाल तयार करण्याचे काम सुरू
3 फडणवीस सरकारचे घोटाळे पुराव्यासह बाहेर काढणार – शेट्टी
Just Now!
X