प्रत्येक बसमध्ये ‘जीपीएस’ यंत्रणा बसवण्याच्या सूचना

दिल्लीतील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रद्युम्न ठाकूर या मुलाच्या हत्येनंतर स्कूलबस आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून त्याअनुषंगाने नागपूर पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभाग, शिक्षणाधिकारी, बस संचालक असोसिएशन, ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्यास सांगितले. स्कूलबसमधील प्रत्येक विद्यार्थ्यांंच्या सुरक्षेची जबाबदारी संबंधित शाळेच्या प्राचार्याची असून त्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना पोलिसांतर्फे करण्यात आल्या.

प्रद्युम्नचा खून स्कूलबसच्या वाहकानेच केल्यानंतर स्कूलबसमधून प्रवास करणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. त्यासंदर्भात पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी आयुक्तालयात जिल्हा स्कूलबस समितीची बैठक घेण्यात आली.

या बैठकीला प्रादेशिक परिवहन विभाग, शिक्षणाधिकारी, बस संचालक असोसिएशन, ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विद्यार्थ्यांची ने-आण करताना घ्यावयाची काळजी आवश्यक सुविधांवर चर्चा करण्यात आली.

प्राचार्यानी वेळोवेळी पालक व बस संचालकांची बैठक घेऊन विद्यार्थ्यांची सुरक्षा, बस वाहतुकीतील इतर समस्यांवर चर्चा करावी आणि आवश्यकतेनुसार सुविधांमध्ये सुधारणा करावी, असे सांगण्यात आले. यावेळी बस संचालकांनी पोलिसांना सांगितले की, दुपारी ३ वाजतानंतर सर्व बस मुलांना सोडून त्यांच्या वाहनतळाच्या ठिकाणी उभ्या करण्यात येतात. मात्र, त्यानंतरही अनेक मुले रस्त्यांवर बसची वाट बघताना दिसतात.

शाळांनी त्यांना विनंती केल्यास प्रतीक्षा करणाऱ्या मुलांनाही सेवा देण्याची हमी बस संचालकांनी दिली. विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी पालकांमध्ये भयमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वाना सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्या प्राचार्याची असते, असा इशारा बोडखे यांनी यावेळी दिला. या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर, इतर विभागांचे प्रमुख आणि वाहतूक पोलीस उपस्थित होते.

पोलिसांच्या सूचना

शाळांनी आणि बस संचालकांनी सर्वप्रथम त्यांच्या बसमध्ये ‘जीपीएस’ यंत्रणा बसवावी, सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, बसची वेळोवेळी फिटनेस चाचणी घ्यावी, व्यसनाधीन वाहनचालक कामावर ठेवू नये, प्रत्येक बसमध्ये वाहक नेमावा, आदी सूचना यावेळी पोलिसांनी केल्या.