‘आरडीएसओ’ची मंजुरी

सध्या  ताशी २५ किमी वेगाने धावणारी नागपूर मेट्रो आता लवकरच ताशी  ९० किमी वेगाने धावायला तयार असेल. आगामी काळात याच वेगाने मेट्रोची ‘ट्रायल रन’ होणार आहे. त्यासाठी परीक्षण करण्यासाठी बुधवार, १२ सप्टेंबर रोजी ‘आरडीएसओ’ने (रेल्वे डिझाईन सेफ्टी ऑर्गनायझेशन) नागपूर दौरा केला. तयारीसंबंधीचा आढावा घेऊन महामेट्रोच्या विनंतीला मंजुरी दिली. एच.के.  रघु यांच्या नेतृत्वात ‘आरडीएसओ’च्या चमूने मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकल्पाची संपूर्ण माहिती अधिकाऱ्यांना दिली. चमूने प्रथम एयरपोर्ट साऊथ मेट्रो स्थानकाचे निरीक्षण करून तेथील सुविधांची तपासणी केली. यानंतर मिहानमधील देखभाल दुरुस्ती डेपोला भेट दिली. एयरपोर्ट साऊथ मेट्रो स्थानक, न्यू एयरपोर्ट मेट्रो स्थानक व खापरी मेट्रो स्थानकाला भेट दिली. महामेट्रोच्या शंटर, हायड्रॉलिक जॅक आणि इतर बचाव उपकरणांचे निरीक्षण देखील त्यांनी केले. यावेळी महामेट्रोचे वरिष्ठ महाव्यवस्थापकांमध्ये जनक कुमार गर्ग, नरेश गुरबानी, आलोक कुमार सहाय, जय सिंग यांच्यासह महामेट्रोचे इतर अधिकारी आणि सल्लागार उपस्थित होते.