अकोला : २२ वर्षीय विवाहित महिलेची समाज माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील एक तरुण व दाम्पत्यासोबत ओळख झाली. त्या विवाहितेला मूलबाळ होत नसल्याने तिने समाज माध्यमावर पोस्ट टाकली. मुख्य आरोपीसह तिघांनी बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद बुद्रुक येथील आसरा माता देवीच्या मंदिरात नवस फेडण्याचा सल्ला दिला. काही दिवसांनी ते सर्व नवस फेडण्यासाठी दोनद खुर्द येथे आले. नवस केल्यानंतर पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील एका लॉजवर विवाहित महिलेला ते घेऊन गेले. त्या ठिकाणी गुंगीचे औषध देऊन विवाहित महिलेवर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून बार्शीटाकळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

बार्शीटाकळी तालुक्यातील एका गावातील २२ वर्षीय विवाहित महिलेची इन्स्टाग्राम, फेसबुकवरून बुलढाणा जिल्ह्यातील एक दाम्पत्य व एका तरुणाशी ओळख झाली. पीडित महिलेने ‘मला मूलबाळ होत नाही, म्हणून फेडायचा आहे, एखादे चांगले ठिकाण सूचवा, अशी पोस्ट टाकली होती. त्यानंतर या आरोपींनी बार्शीटाकळी तालुक्यामधील पिंजर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दोनच खुर्द येथील आसरा माता मंदिरात येण्याचे विवाहितेला सूचवले. त्या ठिकाणी नवस फेडण्याचे ठरल्याने मुख्य आरोपी सुपेश महादेव पाचपोर (२३), रा. बाभुळगाव, ता. जळगाव जामोद, नागेश हिवराळे आणि ज्योती नागेश हिवराळे (२३), बोथाकाजी, ता. खामगाव, जि. बुलढाणा हे तिघे त्या ठिकाणी गेले. त्यांनी मंदिरात नवस केला. त्यानंतर ते पुणे जिल्ह्यातील देहू आळंदी येथे गेले. त्या ठिकाणी एका लॉजवर गेल्यानंतर पीडितेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सुपेश पाचपोर याने बलात्कार केला.

पीडित महिलेला पुणे येथे सोडून आरोपी परत आले. लॉजवर घडलेल्या प्रकाराने पीडित महिला हादरली होती. तिने सरळ बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ गुन्हे दाखल करून या घटनेतील तिन्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी ठाणेदार दीपक वारे यांनी एका विशेष पथकाची नियुक्ती केली. पथकातील हे. कॉ. नागसेन वानखेडे, पो. कॉ. ईश्वर पातोंड, मनीष घुगे यांनी आरोपींना अवघ्या सहा तासात अटक केली. घटनेतील आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. समाज माध्यमातील ओळखीतून विवाहितेसोबत मोठा अनर्थ घडल्याने खळबळ उडाली आहे.