गडचिरोली : घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षांच्या चिमुकलीला स्वतःच्या शासकीय निवासस्थानी बोलावून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शिपायाने अत्याचार केला. एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गावात ९ मार्च रोजी ही घृणास्पद घटना घडली. वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने पीडितेची उपचाराअभावी हेळसांड झाल्याने संताप व्यक्त होत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, संतोष नागोबा कोंडेकर (५२, रा. भेंडाळा ता. चामोर्शी) असे आरोपीचे नाव आहे. ९ मार्चला दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पीडित मुलगी स्वतःच्या घरासमोर खेळत होती. शेजारी आरोग्य कर्मचाऱ्यांची शासकीय निवासी वसाहत आहे. संतोष कोंडेकर हा तिथे एकटाच राहतो. त्याने मुलीला जवळ बोलावले व घरात नेऊन तिच्याशी कुकर्म केले. हा प्रकार एका मुलीने पाहिला व घरी जाऊन सांगितला. त्यानंतर या घटनेला वाचा फुटली. पीडितेला घेऊन कुटुंबीय गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले, पण तिथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. त्यामुळे उपचारासाठी मुलीला घेऊन ते रात्री जिल्हा महिला व बाल रुग्णालयात पोहोचले.

हेही वाचा >>>चंद्रपूर : लोकसभा उमेदवारीसाठी वडेट्टीवार विरूध्द धानोरकर वाद! शिवानी वडेट्टीवार समर्थकांसह थेट दिल्लीत…

 मुलीला १० मार्चला सकाळी अधिक उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले आहे. पीडितेच्या आईच्या जबाबावरून गडचिरोली ठाण्यात बलात्कार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासासाठी प्रकरण एटापल्ली तालुक्यातील संबंधित पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान, ही घटना अतिशय दुर्दैवी असून सविस्तर अहवाल मागविण्यात येईल. वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने उपचारात हलगर्जी झाली असेल तर संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेनंतर आरोपी संतोष कोंडेकर फरार झाला आहे. सुरूवातीला ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून काम करणारा संतोष दोन वर्षांपासून एटापल्ली तालुक्यातील आरोग्य केंद्रात शिपाई पदावर नियुक्त आहे. त्याचा शोध सुरु असल्याचे पेंढरीचे उपअधीक्षक जगदीश पांडे यांनी सांगितले.